पुणे महापालिकेच्या ९३ रजा मुदत शिक्षकांच्या वर्षाखेरचा आनंद द्विगुणित

पुणे :पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ३१ डिसेंबर पूर्वी सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्याची ग्वाही दिल्याने या रजा मुदत शिक्षकांचा दिवाळी प्रमाणे ३१ डिसेंबरचा आनंद द्विगुणित होणार आहे. त्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही आयुक्त विक्रम कुमार यांचे शिंदेशाही पगडी देऊन अभिनंदन केले. तसेच सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांचे अभिनंदन करुन, त्यांना शुभेच्छा दिल्या.

पुणे महापालिकेच्या ९३ रजा मुदत शिक्षकांना सेवेत कायम करण्यासाठी मंत्री श्री. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शिक्षण सेवकांना सेवेत कायम करण्यासाठी शासन आदेश नुकताच जारी झाला. त्याबद्दल शिक्षण सेवकांच्यावतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन घोले रोड येथील क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी आयुक्त विक्रम कुमार डिसेंबर अखेरपर्यंत नियुक्ती पत्र देण्याची ग्वाही दिली.

यावेळी आयुक्त विक्रम कुमार, उपायुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, शिक्षण विभागाचे राजू नंदकर, संतोष वारुळे, चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे यांच्या सह सर्व ९३ रजा मुदत शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, राज्य सरकार हे सर्व सामान्यांप्रती समर्पित सरकार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात भरीव वाढ करुन १६ हजार करण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ पुणे महापालिकेच्या सर्व रजा मुदत शिक्षकांनाही मिळाला. त्यांना सेवेत कायम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन निर्णय घेत दिलासा दिला. या सर्वांनाही यापूर्वीच थकबाकी आधीच मिळाली आहे. नियुक्ती पत्र डिसेंबरपूर्वीच मिळणार असल्याने वर्षाखेरचा आनंद देखील द्विगुणित होणार आहे.

शासनाने अतिशय जलदगतीने निर्णय घेऊन आपली भूमिका चोख बजावली आहे. त्यामुळे शिक्षकदेखील आपल्या कर्तव्यात कसूर बाकी न ठेवता, सुशिक्षित आणि सदृढ समाज निर्मितीत आपली मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले की, शासनाने शिक्षकांचा न्याय देण्यासाठी जलदगतीने निर्णय घेतला. पुणे महापालिका देखील ९३ शिक्षकांप्रती अनुकूल असून, सर्वांना डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत नियुक्ती पत्र देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, सर्व शिक्षकांनी कायम झाल्यानंतर उत्तम समाजासाठी चांगला व्यक्ती घडविण्यात मोलाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

See also  डबल डेकर नको, मिनी बस घ्या - माजी नगरसेवक सनी निम्हण यांची मागणी