महाराष्ट्र गोसेवा आयोगाला शासनाच्यावतीने आवश्यक सहकार्य करू- मंत्री राधाकृष्ण विखे –पाटील

पुणे :-राज्यामध्ये गाईंचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी विविध गोशाळा समर्पित भावनेने काम करीत असून या कार्यासाठी शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत केली जाईल, यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाला लागणारा निधी व मनुष्यबळ कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दिली.

पशुसंवर्धन आयुक्तालय,औंध येथे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पशुसंवर्धन आयुक्त हेमंत वसेकर, सहआयुक्त शितलकुमार मुकणे, आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी, संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय आणि उद्धव नेरकर उपस्थित होते.

श्री.विखे पाटील म्हणाले,गोसेवा आयोगाची स्थापना करताना समिती सदस्यांच्या सूचना विचारत घेण्यात आल्या. या क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींची आयोगामध्ये नेमणूक करण्यात आली आहे. गोशाळांना अनुदान वितरणाचे अधिकारही देण्यात आले आहे. आयोगासाठी आवश्यक तो मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल आणि आयोगाच्या कामासाठी आणखी निधी वाढवून देण्यात येईल.

गोसेवा आयोगाची मूळ संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची असून त्यांची प्रेरणा घेऊन राज्यात महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. सेवाभावी वृत्तीचे काम असल्यामुळे राज्यात गोसेवा आयोगाच्या सदस्यांना आवश्यक ती मदत पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्याचे निर्देश मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिले.

समाजामध्ये देशी वाणांचे दिवसेंदिवस महत्त्व वाढत नागरिकांनी त्यांचे संवर्धन करण्यास सुरुवात केली आहे. देशी वाणांचा प्रचार व प्रसार करण्याची फार मोठी संधी आहे. गोसेवा आयोगानी याक्षेत्रात काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विदर्भातील ११ जिल्ह्यात दर दिवसाला केवळ १० लाख लिटर उत्पादन होते. त्यामुळे विदर्भातील ११ जिल्ह्यात दुग्धव्यवसाचा प्रचार व प्रसार करण्याच्यादृष्टीने ४०० कोटी रुपयांचा कार्यक्रम हाती घेतला आहे, असेही पशुसंवर्धन मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले.

श्री. मुंदडा म्हणाले, देशात आजपर्यंत सहा राज्यात गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. समाजात देशी गाईंचे संवर्धन करणाऱ्या विविध सामाजिक संस्था कार्यरत आहेत. यासंस्थेला सोबत घेऊन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे नाव देश पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र गोहत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी आयोगाच्यावतीने करण्यात येणार आहे. राज्यात आतापर्यंत ५० गोरक्षकांनी प्राण गमावले असून त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

श्री. वसेकर म्हणाले, राज्यात पशुंचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आला आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगासाठी विविध शासकीय विभागातील १४ पदसिद्ध सदस्य तर पशुकल्याण, प्राणी व्यवस्थापन, पशुवैद्यकीय विज्ञान, दुग्धव्यवसाय, जैवतंत्रज्ञान, पणन, कायदा, सामाजिक कार्य किंवा आधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रातील तसेच अशासकीय संस्था, गोसदन, गोशाळा, पांजरपोळ व गोरक्षण संस्था आदींचे प्रतिनिधी म्हणून ७ अशासकीय सदस्यांची नामनिर्देशनाने नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. वसेकर यांनी दिली.

See also  बसथांब्यामध्ये बैठक व्यवस्था बसविण्याबाबत मनसेचे मागणी