कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – ना. चंद्रकांत पाटील

ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे भूमिपूजन तथा फिरते पुस्तक वाचनालयाचे लोकार्पण
कोथरूड : पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते काम करत असतात. त्यामुळे कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करुन, त्यांना सुखी, समाधानी आयुष्य मिळवून देणे हे माझे कर्तव्य समजतो, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या आमदार निधीतून कोथरुडकर मधील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यात ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड मध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी सुरू केलेल्या फिरते पुस्तक वाचनालय उपक्रमाअंतर्गत ‘मृत्यूंजयकार’ शिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ दुसऱ्या फिरते पुस्तक वाचनालयाचे लोकार्पण नामदार पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला,शहर उपाध्यक्ष शाम देशपांडे,कोथरूड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे सर, श्री.पुजारी, सरचिटणीस गिरीश खत्री, प्रा. अनुराधा एडके, दीपक पवार, विठ्ठल बराटे, भाजपा महिला मोर्चा प्रभारी व कोथरूडच्या सरचिटणीस मंजुश्री खर्डेकर, स्थानिक नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, बाळासाहेब टेमकर, रणजित हरपुडे यांच्या सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा सर्व कार्यकर्त्यांना आग्रह असतो की, तुम्ही ज्या समाजात राहता. त्या समाजातील प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी होईल, यासाठी प्रयत्न करावेत. माननीय मोदीजींचा हा संदेश कार्यकर्त्यांसाठी ध्येय मंत्र आहे. त्यामुळे कोथरुड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करुन त्यांना सुखी समाधानी आयुष्य मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न असतो. त्यासाठी विविध उपक्रम कोथरुड मतदारसंघात राबवित आहे.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, कोथरुडमध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी मोफत फिरते पुस्तक वाचनालय सुरू केले. या उपक्रमाला कोथरुडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाची लोकप्रियता दिवसागणिक वाढत असून, त्याचे थांबे वाढविण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार आज कोथरुड मध्ये मृत्यूंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ दुसरे फिरते पुस्तक वाचनालय सुरू करत आहे. यामुळे कोथरुडकरांची अपेक्षा पूर्ण होईल. कोथरुडकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

See also  ICC World Cup २०२३ - ५ ऑक्टोबरला सुरुवात,१९ नोव्हेंबर अंतिम सामना.