पुणे : यशविन सोसायटीमध्ये ७ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्यामला देसाई (अध्यक्ष – नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी, अध्यक्षा – PMC Apex कमिटी) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर माधवी शिंदे (संचालक – MNVTI, कर्वे संस्था) या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
या निमित्ताने यशविन महिला क्रिकेट संघाचा सत्कार करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय रायफल शूटर तेजस्विनी मुळे-लांडगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी १४ आंतरराष्ट्रीय पदके आणि ९१ राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदके जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले असून आशियाई खेळ व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही त्यांनी सहभाग नोंदवला आहे.
तसेच उदयोन्मुख फुटबॉलपटू शरवरी माने हिचाही विशेष सत्कार करण्यात आला. ती AIFF FIFA अकॅडमीसाठी निवड झाली असून भारत U-17 ट्रायल कॅम्पमध्ये सहभागी झाली आहे. ऑस्ट्रिया येथे तिने आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण घेतले असून २०२३ मध्ये ती महाराष्ट्र राज्याची कर्णधार होती. २०२५ मध्ये राज्य विजेतेपद मिळवताना त्याने गोल्डन बूट पुरस्कारही पटकावला आहे.
कार्यक्रमात विविध स्टॉल्स, सांस्कृतिक सादरीकरणे आणि मजेशीर खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा कार्यक्रम “झाडे लावा, झाडे जगवा” या पर्यावरणपूरक संकल्पनेवर आधारित होता. त्यानिमित्ताने उपस्थित सर्वांना रोपे व कुंड्या भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यशविन सोसायटीच्या सांस्कृतिक उपक्रम समितीतील महिलांचा नेहमीच पुढाकार असतो आणि त्या विविध कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडतात, हे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. सोसायटीतील महिला व नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला, अशी माहिती श्री. राघवेंद्रजी देशपांडे यांनी दिली.
























