आगामी निवडणुकीसाठी योग्य समन्वय व संवाद साधून कामे करा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या सूचना

पुणे, दि.११: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय व संवाद साधून कामे करावीत; कामांच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करुन उत्कृष्ट आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित समन्वय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त अण्णासाहेब चव्हाण, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, महानगरपालिकेचे उपायुक्त महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे, सहायक निवडणूक अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मानकांचे सर्व अधिकाऱ्यांनी अवलोकन करावे. मानके सर्वांना अवगत होईल अशा सोप्या भाषेत भाषांतरीत करावीत. तसेच या मानकांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे.

निवडणूकीच्या कालावधीचा विचार करता निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योग्य प्रशिक्षण होईल, याबाबत दक्षता घ्यावी. ईव्हीएम सुरक्षिततेच्या अनुषंगाने महसूल व पोलीस प्रशासनाचे संयुक्त प्रशिक्षण आयोजित करावे. यामध्ये आचारसंहितेचे पालन, उल्लंघन, हिंसककृत्य, विविध परवानग्या, सुरक्षितता तसेच व्हिडीओ कॅमेरे, सीसीटिव्ही, वेबकास्टिंग आदी बाबींचा समावेश करावा.

पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी कमी राहता कामा नये. विशेषतः युवक आणि महिलांची टक्केवारीत वाढ होण्याच्यादृष्टीने ‘स्वीप’अंतर्गत मतदार जनजागृतीकरीता विविध उपक्रम राबवावेत. यासाठी त्या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यासह समाज माध्यमांद्वारे जनजागृतीवर भर द्यावा.

ईव्हीएम सुरक्षितता महत्वाची असून त्यामध्ये ईव्हीएम कक्ष, कक्षाची डागडुजी, कक्षातील वीजयंत्रणा, सीसीटीव्ही, वेबकास्टिंग, अभिलेख जतन तसेच वाहन जीपीएस ट्रॅकिंग, परिसरातील वाहनतळ, ईव्हीएम ने-आण करताना येणारे अडथळे आदी बाबींचा विचार करुन कार्यवाही करावी.

निवडणूकीच्यावेळी निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात सूक्ष्म आराखडा तयार कामाचे नियोजन करावे. समन्वय कक्षाने सर्वंकष आराखडा तयार करावा. माहिती पाठवताना भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या विहीत नमुन्यात माहिती सादर करा. सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करावी. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

यापूर्वीच्या आणि आगामी सार्वत्रिक निवडणूकीची परिस्थिती लक्षात घेता संवेदनशील आणि अतिसंवदेनशील (क्रिटीकल आणि वल्नरेबल) मतदान केंद्रे निश्चित करावीत. निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या शासन निर्णय, शासन परिपत्रक, कायदे यामधील सूचनांची काटेकोर अमंलबजावणी करुन कामकाज सुरळीत पार पाडावे. मागील निवडणुकीच्या वेळी आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असेही डॉ. दिवसे म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी अधिकारी कर्मचारी नियुक्ती, निवडणूक प्रशिक्षण, निवडणूक साहित्य व लेखनसामुग्री, वाहन अधिग्रहन, वाहन आराखडा, संगणकीकरण, स्वीप उपक्रम, ईव्हीएम, आदर्श आचारसंहिता, निवडणूक खर्च, कायदा व सुव्यवस्था, माध्यम कक्ष आदी विषयांबाबत आढावा घेतला.

See also  " 32 स्माईल आर्थोडेंटिक केअर तर्फे ७५० वारकऱ्यांसाठी मोफत दंतचिकीत्सा शिबिर "