माजी आमदार स्व. वल्लभ बेनके यांच्यावर हिवरे बुद्रुक येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे, दि. १२: जुन्नरचे माजी आमदार स्व. वल्लभ बेनके यांच्यावर हिवरे बुद्रुक (ता. जुन्नर) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्व. बेनके यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी ज्येष्ठ खासदार शरद पवार, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार सुनिल टिंगरे, संग्राम जगताप, दिलीप मोहिते, निलेश लंके, अशोक पवार, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार बाळासाहेब दांगट, शरद सोनवणे, पोपटराव गावडे , विलास लांडे, प्रदीप गारटकर, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.संजय काळे आदी उपस्थित होते.

कुकडीच्या धरणाबाबतचे तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, शिवनेरी किल्ला परिसरातील कामे, पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न अशा माध्यमातून जुन्नरच्या विकासात माजी आमदार स्व. वल्लभ बेनके यांचा मोलाचा वाटा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी स्व. वल्लभ बेनके यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, स्व. वल्लभ बेनके यांनी १९८५ मध्ये जुन्नरमधून विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले.त्यांनतर सतत चार वेळा विधीमंडळात निवडून गेले. त्यांच्याकडे प्रत्येकाला आपलेसे करण्याची हातोटी होती तसेच त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी लहान कार्यकर्त्यांना मोठे करण्याचा प्रयत्न केला. स्व. वल्लभ बेनके यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नरत राहू, अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण करुन बेनके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. वळसे पाटील म्हणाले, स्व.वल्लभ बेनके यांच्यासह बेनके कुटुंबाने तालुक्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. वल्लभ बेनकेंच्या निधनामुळे जवळचा सवंगडी गमावल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

वल्लभ बेनके यांच्या निधनामुळे जुन्नर तालुक्यातील निष्ठावान सहकारी गमावला असल्याचे खासदार शरद पवार यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

शासकीय इतमामात बंदुकीच्या फैरींची सलामी व मानवंदना देण्यात आली. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांचे पुत्र आमदार अतुल बेनके यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

See also  बार्टीच्या आश्वासनानंतर संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे