पुणे : महाविकास आघाडी, इंडिया फ्रंटच्या वतीने पुणे येथे आयोजित भव्य कार्यकर्ता मेळावा ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार श्री. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी महासंसदरत्न खासदार, माननीय सुप्रिया सुळे, संसदरत्न खासदार मा. अमोल कोल्हे, राज्यसभा खासदार मा. चंद्रकांत हांडोरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार मा. नाना पटोले, माजी गृहराज्यमंत्री व काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे, आमदार मा. रवींद्र धंगेकर, माजी विधान परिषद सदस्य मोहन जोशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषद आमदार मा. सचिन अहिर, आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार, व राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, मजी आमदार व राष्ट्रीय सरचिटणीस मा. जयदेव गायकवाड, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. जगन्नाथ शेवाळे, पुणे शहर जिल्हाध्यक्ष मा. प्रशांत जगताप, डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ. सुनील जगताप, प्रदेश प्रवक्ते मा. विकास लवांडे, यांच्यासह महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट मधील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, आम्हाला महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे परिवर्तन करायचं आहे त्यासाठी विचारी कार्यकर्त्यांचा संच हा उभा करण्याची आवश्यकता आहे. त्याची पूर्ण तयारी आजच्या या बैठकीतून होते. आपण बघितलं गेल्या साठ ते सत्तर वर्षांमध्ये अनेक राज्यकर्ते आपण पाहिले. काँग्रेसचे पाहिले, समविचारी पाहिले, अगदी भारतीय जनता पार्टीचे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे सुद्धा नेते आपण पाहिले. कधी असं वाटलं नाही की या देशाच्या संविधानाची चिंता ही करण्याची वेळ येईल. कधी असं वाटलं नाही की सामाजिक ऐक्याला धक्का लागण्यासंबंधीची स्थिती या देशामध्ये तयार होईल.
गेले आठ ते दहा वर्षे आपण बघतो मोदी साहेबांचे राज्य आले, एक अजब प्रधानमंत्री आपण या देशामध्ये पाहिला. त्यांची सर्व भूमिका ही गेली अनेक वर्षे या देशाला दिशा द्यायचा प्रयत्न ज्या नेत्यांनी केला त्यांना वेगळ्या रस्त्यावर कसे नेता येईल? हा एक कलमी कार्यक्रम आज राज्यकर्त्यांकडून होत आहे. मोदींची अलीकडची भाषणे बघा एकच गोष्ट आहे, हल्ला करतात देशाच्या महिला प्रधानमंत्र्यांवर, जवाहरलाल नेहरूंवर. जवाहरलाल नेहरू ज्या कुटुंबाने देशासाठी सर्वस्व दिले स्वतः स्वातंत्र्यासाठी आयुष्याच्या आठ ते दहा वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगामध्ये घातला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये संसदीय लोकशाही ही मजबूत कशी होईल, या प्रकारची खबरदारी घेतली, दिल्लीमध्ये देशाची इज्जत वाढवली, आणि आधुनिक विज्ञान व शास्त्र याच्या मदतीने हा देश योग्य दिशेला कसा जाईल, हे महत्त्वाचे काम त्यांनी केले. त्यांनी विज्ञानाच्या आधारे अनेक संस्था उभ्या केल्या आणि हा देश प्रगतीच्या दिशेने नेला. सर्व जग हे मान्य करत आहे पण मोदी साहेब मान्य करत नाही. त्यांना माईक हातामध्ये मिळाला की नेहरूंवर टीका करणं हा एक कलमी कार्यक्रम अलीकडच्या काळामध्ये झालेला आहे. म्हणून राष्ट्राच्या उभारणीसाठी ज्यांनी कष्ट केले, त्याग केला, दृष्टी दिली अशांचा सन्मान जर राज्यकर्त्यांकडून होत नसेल तर हे राज्यकर्ते देशातील सामान्य जनतेच्या हिताची जपणूक करणारच अशा प्रकारचा दावा करता येणार नाही.
आपण नेहमी सांगतो हा देश शेतीप्रधान आहे. अनेक वर्षे मी यावर काम केले महाराष्ट्रात केले, देश पातळीवर केले. आज देशामध्ये प्रति दिवसाला शेतकऱ्यांचे सहा ते सात आत्महत्या होत आहेत, पण हे सरकार ढूंकून बघायला तयार नाही. आज हा देश अन्नधान्याच्या बाबतीत संपन्न झाला पण दुसऱ्या बाजूने शेतकरी अडचणीत आला. एक वर्ष दिल्लीच्या दारावर पंजाब आणि हरियाणाचे काही हजार शेतकरी आंदोलनाला बसले होते. दिल्लीच्या सीमेवर उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये कुटुंबासह त्या ठिकाणी बसले होते. पण सरकारने त्या ठिकाणी ढुंकून सुद्धा बघितले नाही. म्हणून ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना या काळ्या आईची ईमान राखणाऱ्या शेतकऱ्यांच्या, या देशाची भुकेची गरज भागवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताच्या संबंधीची काळजी नसेल तर आपल्याला सामुदायिक शक्ती करावी लागेल व या सरकारला शेतातल्या गवतासारखं उचलून बाजुला करावे लागेल.
आज बेकारीच्या बद्दल केंद्र सरकारने अनेक धोरणे जाहीर केली त्याचे एक वैशिष्ट्य मोदी की गॅरंटी. ही गॅरंटी अशी आहे चेक गॅरंटीचा आहे फक्त त्याच्यावर तारीख लिहिलेली नाही. त्याबद्दल जे काही बघतो त्याच्यावर कुणाची खात्री नाही. आज आपण बघतो गॅरंटी म्हणून अनेक आश्वासने दिली पण ती पूर्ण होत नाहीत. अलीकडच्या काळामध्ये काय नक्की या सरकारने केले? आज हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर जवाहरलाल नेहरू असो, इंदिरा गांधी असो, अटल बिहारी वाजपेयी असो या सगळ्यांनी राज्य आणि केंद्र यांच्यात समन्वय साधला, राज्याच्या अधिकारांचा सन्मान केला. आजचे राज्यकर्ते ते करत नाहीत. आज त्यांनी भूमिका सोडली आहे. मी अनेकदा बघितलं मनमोहन सिंग यांच्या राजवटीमध्ये, त्याच्या आधीच्या काळात नेहरूंच्या राजवटीमध्ये राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा सन्मान त्या ठिकाणी होता. आज मोदींच्या राज्यामध्ये राज्य सरकारच्या बद्दल त्यांची भूमिका अतिशय असहकार्याची आहे. त्यामुळे महाराष्ट्रासारखे अनेक राज्यांचे अनेक प्रश्न शिल्लक आहेत. आपण बघतो अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे त्याची भाषणे केली जातात.
मोदी साहेबांनी ज्याचा उल्लेख याआधी सुद्धा झाला एका भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारी आहे. हे सांगत असताना त्यांनी सांगितले हा भ्रष्टाचार बँकेच्या व्यवहारात केला, हा भ्रष्टाचार पाटबंधारे, पाणी योजना याच्यामध्ये केला. मी जाहीरपणाने सांगितलं आजही माझे त्यांना आव्हान आहे की भ्रष्टाचार तुम्ही केला असे म्हणता, इरिगेशन खात्यात झाले असे म्हणता, तुम्ही म्हणता भ्रष्टाचार बँकेमध्ये झाला अन्य ठिकाणी झाला. केंद्र सरकारने कमिटी नेमावी, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली नेमावी व त्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि ती सबंध देशाच्या समोर ठेवावी. जो कोणी दोषी असेल त्यासंबंधी जे काही तुम्हाला कडक धोरण तुम्हाला आखायचे असेल त्या गोष्टीला आम्हा लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे. माझी खात्री आहे की या गोष्टीत हे राज्यकर्ते फक्त इतर पक्षांच्या लोकांवर टीका टिप्पणी करणे यापेक्षा दुसरे काही गोष्टी करत नाही. दुसऱ्या बाजूने राज्यकर्ते त्यांच्या विचारांचे नाहीत त्यांना अडचणीत आणतात.
सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकणे, त्यांच्यावर खोटे खटले भरणे यासाठी केला जातो हे कुठेतरी आवरले पाहिजे. सत्तेचा गैरवापर कसा केला जातो याची अनेक उदाहरणं आजच्या राज्यकर्त्यांनी दाखवून दिली आहेत. हे आवरायचे असेल तर सामान्य माणसाच्या लक्षात आलंय की ईडी असेल, सीबीआय असेल अन्य संस्था असतील यांचा वापर करून त्यांच्या विचारांशी संमत न होणारे जे जे घटक आहेत त्यांना अडचणी निर्माण करणे, अटक करणे त्यांच्यावर खोटे खटले भरणे या प्रकारची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी सुरू केलेली आहे. याचा अर्थ हाच की मूलभूत लोकशाहीचा जो अधिकार आहे त्यावर घाव घालण्याचा हा प्रकार आहे. तो जर आवरायचा असेल तर आपल्याला या देशामध्ये बदल करण्याशिवाय गत्यांतर नाही, हा बदल करायचा असेल तर भाजपाच्या विरुद्ध जेवढ्या विचारधारा आहेत त्यांना एकत्रित करून जागृत करणे व त्यांच्यासोबत सामान्य जनतेशी संपर्क साधून त्या सामान्य जनतेला याचे महत्त्व पटवून देणे आणि देशामध्ये परिवर्तन आणणे ही गोष्ट आपल्याला करायची आहे. ती करण्यासाठी काँग्रेस पक्ष असो किंवा इतर पक्ष असो या सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्नांची पराकष्टा करावी एवढाच आग्रह आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला करतो,