शेवाळेवाडी गावाला महापालिकेने बंद नळाने पाणी पुरवठा करावाभाजपा जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांचे महापालिकेला निवेदन

मांजरी : महापालिकेने शेवाळेवाडी  गावाला बंद नळाने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी केली असून महापालिका पाणी पुरवठा विभागाला तसे निवेदन देण्यात आले आहे.


शेवाळेवाडी गावाला १९६५ सालापासून पुणे महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा केला जात होता. त्यावेळेस भैरोबा पंपिंग स्टेशन मधील मैला मिश्रित पाणी या परिसरात सोडले जायचे. त्यामुळे येथील विहरी व बोअरवेलचे पाणी दूषित होत असल्याने शेवाळेवाडी गावाला मनपा द्वारे पाणी पुरवठा केला जात होता. काही काळानंतर शहराची लोकसंख्या वाढत गेली आणि पाणी उशिरा व कमी दाबाने यायला लागले त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने विहरी खोदून त्याद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा सुरू केला.  परंतु काही वर्षांपूर्वी पुणे मनपा ने मुंढवा जॅकवेल चे दूषित पाणी जुन्या मूळा-मुठा कॅनॉल मधे सोडल्याने या परिसरातील पाण्याचे स्त्रोत दूषित झाले होते.

त्यामुळे मनपा ने गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. परंतु टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा हा धोकादायक असून पाणी चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आणून दिले आहे. तसेच सध्या पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने नागरिकांना आठवड्यातून एकदा पाणी मिळत आहे, नुकतीच मांजरी गावाला पुणे मनपा कडून बंद नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे, शेजारीच शेवाळेवाडी गाव लागूनच असल्याने गावाला पाणी देणे गरजेचे असून सोईस्कर राहील यासाठी गावाला पाणी पुरवठा नव्याने सुरू करावा असे या निवेदनात शेवाळे यांनी म्हटले आहे.

See also  मोहोळ यांच्या झैनी मशिदीत बोहरी बांधवांशी गप्पा