उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड तारांगण प्रकल्पाचे लोकार्पण

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निर्मित चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण तारांगण प्रकल्पाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री महेश लांडगे, उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, पिंपरी चिंचवड मानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांगण प्रकल्पाची पाहणी केली. तारांगणात खगोलशास्त्राची चित्रफीत पाहिल्यानंतर तारांगणाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या सूर्यमालिकेची चांगल्याप्रकारे माहिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘दिवसा तारे पहाणे’ ही बोलण्यातील कल्पना तारांगणाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली. तासभर तारांगणात बसून सृष्टीची रचना समजून घ्यावी असे वाटले. आपली मुले आणि युवकांच्या ज्ञानात सकारात्मक भर घालण्याचे आणि विज्ञानाकडे आकर्षित करण्याचे काम तारांगणाच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संचालक तुपे यांनी तारांगण प्रकल्पाविषयी माहिती दिली.

असा आहे तारांगण प्रकल्प

ऑप्टोमेकॅनिकल व डिजीटल पद्धतीच्या माध्यमातून हायब्रिड प्रोजेक्शन पद्धतीचे अत्याधुनिक तारांगण विकसित केलेले आहे. तारांगण प्रकल्प २ हजार ४१० चौ.मी. क्षेत्रफळात विकसित करण्यात आलेला आहे. तारांगण प्रकल्पात ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांचा सहभाग असलेल्या समितीचे मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. १५.७ मीटर व्यासाच्या या तारांगणामध्ये १२२ आसन क्षमता असून ‘खगोलविज्ञानातील १७ वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम फित जपान येथील ‘गोटो’ कंपनीच्या सहाय्याने तयार केलेले आहेत. या व्यतिरिक्त १०० आसन व्यवस्थेचे स्वतंत्र सभागृह सुविधा उपलब्ध आहे.

नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन केले. नवीन प्रशासकीय इमारत १८ मजली होणार असून तीन बेसमेंट असणार आहेत. इमारतीचे भूखंड क्षेत्र ८.६५ इतके आहे. ९१.५ हजार वर्ग मिटरचे बांधकाम होणार आहे. याठिकाणी ६०० चारचाकी आणि ३ हजार दुचाकी वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था असणार आहे. महापौर, उपमहापौर, आयुक्त, उपायुक्त, स्थायी समिती कार्यालय, बहुउद्देशीय व महानगरपालिका सर्वसाधरण सभागृह यांच्यासह महानगरपालिकेच्या ६० विभागांची कार्यालये या ठिकाणी असणार आहेत. इत्यादी सोयी सुविधांनी सुसज्ज अशी ही इमारत असणार आहे.

See also  कोथरूड मध्ये सहा ऑक्टोबर पासून जेष्ठोत्सवाचे आयोजन