यशवंत पंचायत राज व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील पुरस्कारांचे वितरण

पुणे  : स्वच्छतेला जीवनामध्ये खूप महत्त्व असून संत गाडगेबाबांचा आदर्श समोर ठेवून  प्रत्येकाने स्वच्छता जीवनपद्धती म्हणून अंगिकारावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित यशवंत पंचायत राज, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, अमृत महाआवास अभियान विभागस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सातारच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपायुक्त रामचंद्र शिंदे, राहूल साकोरे, विकास मुळीक आदी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, गाडगे महाराजांनी हजारो किलोमीटर पायी प्रवास करुन स्वच्छतेची चळवळ सुरु केली. त्या काळात त्यांनी स्वच्छतेचे महत्व गावोगावी पोहोचविले. आजही आरोग्याच्यादृष्टीने स्वच्छतेला तेवढेच महत्व आहे. म्हणून प्रत्येकाने परिसर स्वच्छतेला महत्त्व द्यावे. पुढील पिढीसाठी स्वच्छ, सुंदर वसुंधरा हवी असेल प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेच्या सवयींचा अंगीकार करणे गरजेचे आहे. पर्यावरण प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले, शाळांनी मुलांच्या स्वच्छतेबाबत विशेष लक्ष द्यावे. मुलांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करणे गरजेचे आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्याने अनेक धोके निर्माण होणार आहेत. हे धोके टाळण्यासाठी पर्यावरण जागृती आवश्यक आहे. गावातील स्वच्छता व नाविन्यपूर्ण कामे हे अभियानापुरते मर्यादित न ठेवता ती सातत्याने करावी, असे आवाहन त्यांनी केले.

स्वच्छता अभियानामध्ये यशस्वी होण्यासाठी गावातील नेतृत्व खूप महत्वाचे आहे. शासनाच्या योजना राबविण्यासाठी शासकीय अधिकारी गावात येऊन पुढाकार घेत असेल तर गावकऱ्यांनीही सहभाग द्यावा असे सांगून श्री.चव्हाण यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

श्रीमती नागराजन म्हणाल्या, घरकूल आणि स्वच्छता या मूलभूत सुविधा आहेत. पुरस्कार प्राप्त विजेत्यांपासून प्रेरणा घेऊन अन्य गावांनीही याचे अनुकरण करावे. सन्मानपूर्ण व निरोगी आयुष्य देण्यासाठी महाआवास व स्वच्छता अभियान खूप महत्त्वाचे आहेत.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पारितोषिक विजेत्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा ग्रामपंचायतींचा धनादेश, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा गौरवही करण्यात आला. कार्यक्रमाला पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना २०२०-२१ व २०२१-२२ एकत्रित स्पर्धेतील विजेत्या ग्रामपंचायती:  बनवडी जि.सातारा-प्रथम, वाटंगी जि. कोल्हापूर व काळवाडी जि. पुणे विभागून द्वितीय, नांगोळे व खंबाळे जि. सांगली-तृतीय.

अमृत महाआवास अभियान २०२२-२३ मधील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेतील विजेते सर्वोत्कृष्ट जिल्हे: सातारा- प्रथम, सांगली-द्वितीय व कोल्हापूर-तृतीय. सर्वोत्कृष्ट तालुके- जावळी (सातारा)- प्रथम, कराड (सातारा)-द्वितीय व सातारा-तृतीय. सर्वोत्कृष्ट  ग्रामपंचायती- येळगाव व भुडकेवाडी (सातारा)- प्रथम, काठी ता.पाटण-द्वितीय, आचेगाव (सोलापूर)- तृतीय. शासकीय जागा उपलब्धतेबाबत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके: कोरेगांव (सातारा)- प्रथम, सातारा- द्वितीय व कराड- तृतीय. वाळू उपलब्धतेबाबत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके : पंढरपूर- प्रथम व पाटण-द्वितीय.

राज्य पुरस्कृत आवास योजनेचे विजेते सर्वोत्कृष्ट जिल्हे : सातारा-प्रथम, कोल्हापूर व पुणे द्वितीय विभागून, सांगली-तृतीय. सर्वोत्कृष्ट तालुके :  महाबळेश्वर (सातारा)- प्रथम, खेड (पुणे)- द्वितीय व माण (सातारा)- तृतीय. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत : बोंद्री (सातारा)- प्रथम, नागोळे (सांगली)- द्वितीय व गव्हांण (सांगली)- तृतीय. शासकीय जागा उपलब्धतेबाबत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके: आंबेगाव (पुणे)- प्रथम, मंगळवेढा (सोलापूर)-द्वितीय व माढा(सोलापूर)- तृतीय. उपलब्धतेबाबत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके : पंढरपूर- प्रथम व पाटण द्वितीय.

यशवंत पंचायत राज अभियान २०२०-२१ राज्यस्तर : जिल्हा परिषद कोल्हापूर- प्रथम व पंचायत समिती कागल- द्वितीय.

विभागस्तर पुरस्कार २०२०-२१:  पंचायत समिती कागल- प्रथम, पंचायत समिती गडहिंग्लज- द्वितीय, पंचायत समिती माढा- तृतीय.

यशवंत पंचायत राज अभियान २०२२-२३ राज्यस्तर : जिल्हा परिषद कोल्हापूर- द्वितीय. विभागस्तरावर पंचायत समिती अक्कलकोट- प्रथम, पंचायत समिती गडहिंग्लज- द्वितीय, पंचायत समिती शिराळा- तृतीय.

विभागस्तरीय विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती : सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्व. वसंतराव नाईक पुरस्कार- बनवडी (सातारा), पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वाटंगी (कोल्हापूर), शौचालय व्यवस्थापनासाठी स्व.आबासाहेब खेडकर पुरस्कार- भोसे (सोलापूर).

See also  पुणे मेट्रोच्या प्रकल्पांचा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून आढावा
प्रकल्पांना गती देण्याचे दिले निर्देश