लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ

पुणे : जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ८ हजार ३८२ मतदान  केंद्रांसाठी द्यावयाच्या ११ हजार ८९८  मतदान यंत्रांची जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन)  प्रकिया करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी  मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरवले आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ११ हजार ८९८ बॅलेट युनिट, ११ हजार ८९८ कंट्रोल युनिट आणि १२ हजार ७४९ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.

सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत. या यंत्रांपैकी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या १४१ टक्के बॅलेट आणि कंट्रोल  युनिट, तर १५२ टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूममध्ये आणि पुणे लोकसभा मतदारसंघासाठीची यंत्रे भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्या-त्या विधानसभा मतदारसंघात देखील मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे डॉ.दिवसे यांनी सांगितले.

सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे योगेश बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे गणेश नलावडे, भारतीय जनता पार्टीचे राजाभाऊ शेडगे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अशोक कांबळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रमेश सकट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित गव्हाणे, शिवसेनेचे राजू गवळी आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

See also  सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने 'सुपर सनीज विक' चे आयोजन