डाॅ.बाबासाहेब अंबेडकरांनी शिक्षणाला परिवर्तनाचे साधन मानले – डाॅ ज्योती गगनग्रास

पुणे : गणेशखिंड येथिल मॉडर्न कॉलेज  मध्ये  डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन करण्यात आले. 
जयंती कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी भूषवले.

या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर महात्मा फुले यांच्यापासून इतर थोर समाजसुधारकांचा कसा प्रभाव पडला हे सांगत, या महापुरुषांच्या समतावादी कार्यामुळे बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानल्याचे विषद केले. आपल्या प्रास्ताविकात पुढे डॉ. संजय खरात यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील योगदान, गोलमेज परिषद, ज्ञाननिर्मितीतील योगदान यावर भाष्य करत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रउभारणीचा पाया घातल्याचे प्रतिपादन केले. वर्तमानातील नीती आयोग आणि अगोदरच्या योजना आयोग यासारख्या असंख्य संविधानिक मंडळाच्या स्थापनेतील कार्याचा आढावा घेत डॉ खरात यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य वर्तमान संदर्भात कसे प्रासंगिक आहे याचे वर्णन केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आणि महाविद्यालयातील कला शाखेच्या उप- प्राचार्या डॉ. ज्योती गगनग्रास यांनी ऐतिहासिक – समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा तसेच लेखनाचा आढावा घेतला. १९व्या शतकातील सामाजिक प्रश्न म्हणून गंभीर बनलेल्या जातीव्यवस्था, सामाजिक उतरंड, श्रेष्ठ –कनिष्ठता, कामगार, आदिवासी समूहाचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भरीव कार्य करत स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा पुरस्कार केला. आपल्या मांडणी मध्ये डॉ गगनग्रास यांनी आंबेडकरांचे समाजशास्त्र, मानव्यशास्त्रीय संशोधनातील योगदान याची दाखल घेत बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला परिवर्तनाचे माध्यम मानल्याचे अधोरेखित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यासह इतर महापुरुषांच्या विचारांचा पाठ कला शाखेव्यतिरिक्त इतर शाखांच्या अभ्यासक्रमां मध्येही समाविष्ट असावा असे मत व्यक्त केले.   

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त भरवलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल डॉ. संदीप सानप यांनी जाहीर केला. या स्पर्धेत विजय झालेल्या प्रियांका सरकाले (प्रथम), रोहित परब (द्वितीय) आणि नेहा ठाकरे (तृतीय) या विद्यार्थ्यांचा सत्कार माननीय प्राचार्याच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. श्वेता सावळे यांनी तर कार्यक्रमाचा समारोप प्रा. कुमोद सपकाळ  केला. महाविद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जयंती निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानाला उपस्थित राहत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

See also  नांदेड जिल्ह्यातील बोंडर गावातील भीमसैनिक अक्षय भालेराव हत्याकांडाच्या विरोधात औंध डी पी रोड मध्ये रिपब्लिकन पक्षाची निदर्शने आंदोलन