८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि अत्यावश्यक सेवेतील एक हजार ६७५ मतदारांना टपाली मतदानाची सुविधा

पुणे : जिल्ह्यात पहिल्यांदाच ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून जिल्ह्यातील १ हजार ६७५ मतदारांनी या सुविधेसाठी अर्ज भरून दिले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यातील चारही मतदार संघात मिळून ८५ वर्षावरील १ हजार ३९७ आणि २६५ दिव्यांग मतदारांनी 12 डी अर्ज भरुन दिला असून त्यांना घरुन मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तर अत्यावश्यक सेवेतील १३ मतदारांनी १२ डी नमुना भरुन सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्रात (पीव्हीसी) जाऊन टपाली मतदानाची इच्छा व्यक्त केली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार टपाली मतदान करु इच्छिणाऱ्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी १२ डी भरुन घेण्यात आले होते. तसेच अधिसूचित अत्यावश्यक सेवेतील १२ डी अर्ज भरुन दिलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही ही सुविधा देण्यात येणार आहे.

संबंधित मतदार संघातील मतदानाच्या दिवशी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन मतपत्रिकेवर मत नोंदवून घेण्यात येणार आहे. अधिसूचित अत्यावश्यक सेवेतील १२ डी अर्ज भरुन दिलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्या त्या मतदार संघासाठी निश्चित केलेल्या तारखांना सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्रात (पीव्हीसी) जाऊन टपाली मतदान करता येणार आहे.

८५ वर्षावरील ज्येष्ठ मतदारांचे सर्वाधिक अर्ज पुण्यात
पुणे लोकसभा मतदार संघात सर्वाधिक ४६३ इतक्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ मतदारांनी टपाली मतदानाचे अर्ज भरुन दिले आहेत. या मतदार संघात ४२ दिव्यांग मतदारांनी, बारामती लोकसभा मतदार संघात २९० ज्येष्ठ मतदार तर ९१ दिव्यांग मतदारांनी 12 डी अर्ज भरुन दिले आहेत.

शिरुरमध्ये ३८१ ज्येष्ठ मतदार, ८७ दिव्यांग मतदार आणि अत्यावश्यक सेवेतील १० मतदारांनी १२ डी अर्ज भरुन दिले आहेत. मावळ मतदारसंघात ८५ वर्षावरील २६३ ज्येष्ठ मतदार, ४५ दिव्यांग तर अत्यावश्यक सेवेतील ३ मतदारांनी टपाली मतदानाचे अर्ज भरुन दिले आहेत, अशीही माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

See also  सेवानिवृत्त पोलिसांचा औषधांचा प्रश्न मार्गी लावण्याची राज्य सरकारकडे मागणी - मिलिंद गायकवाड