वरसगाव धरणावर महाकाय मगर आढळल्याने घबराट; तुडुंब भरलेल्या वरसगाव धरणावरील स्थिती

खडकवासला : तडुंब भरलेल्या आणि खडकवासला धरण साखळीतील सर्वात मोठे धरण असलेल्या वरसगाव धरणाच्या  भिंतीवर काल रात्री महाकाय मगर आढळून आली. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी धरणावर गस्त घालत असताना साडेआठ वाजता त्यांना महाकाय मगर दिसली. तातडीने वन विभागाला माहिती देण्यात आल्यानंतर बावधन येथील वन्य प्राण्यांचे रेस्क्यु करणाऱ्या पथकने या महाकाय मगरीला पकडून मूळ अधिवासात सोडले. धरणाच्या भिंतीवर मगर दिसल्याने कर्मचारी भयभीत झाले.

वनविभाग आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी  सांगितले की, वरसगाव धरणाच्या मूख्य भिंतीवर लोखंडी गेट जवळ  गवतात पाच ते सहा फूट लांबीची पूर्ण वाढ असलेली मगर रात्री साडेआठच्या  सुमारास गस्तीवर असलेल्या राहुल जाधव व कुणाल कुराडे या कर्मचाऱ्यांना दिसली. त्यांनी बॅटरीच्या उजेडात मगर असल्याची खात्री केली वरसगाव धरणाचे शाखा अभियंता वीरेश राऊत यांनी घटनास्थळी धाव घेत  तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे वेल्हे तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगोटे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली.त्यानी  बावधन येथील वन्य प्राण्यांचे रेस्क्यू करणाऱ्या पथकाला  पाचारण केले.


गोविंद लंगोटे यांनी सांगितले की पूर्ण वाढ झालेली ही मगर तिचा मार्ग चुकल्याने धरणाच्या भिंतीवर  गेटमधून आली. परत तिला पाण्याकडे जाण्याचे सुचले नसावे म्हणून ती ह्याच परिसरात फिरत होती. भारतीय जातीची ही मगर शांत स्वभावाची असल्याने पकडणे सोपी असले तरी बावधन येथील वन्य प्राण्यांचे रेस्क्यू करणाऱ्या पथकाला बोलवण्यात आले. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मगरीला पकडण्याची मोहीम सुरू केली. रेस्क्यू पथकाच्या 15 जवानांसह वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगोटे, वनरक्षक मनोज महाजन, सुनीता अर्जुन, स्वप्निल उंबरकर यांच्यासह दहा कर्मचारी आणि धरणावरील सुरक्षा रक्षक हे मगरीला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते. ती सतत धरणाच्या भिंतीवर चढत होती परंतु तिला चढता येत नव्हते. तिला हुसकावणाऱ्यांवर चवताळून येत होती तरी हातात काठी आणि बॅटरी असल्याने सर्वांनाच कसरत करावी लागली.  अखेर साडेतीन वाजता मगरीला पकडून एका रेस्क्यू व्हॅन मध्ये ठेवण्यात आले. परत भिंतीवर येण्याची शक्यता असल्याने या मगरीला तेथेच परत पाण्यात सोडण्या ऐवजी  वेगळ्या अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती लंगोटे यांनी दिली. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये असेही त्यांनी सांगितले.


मगर धरणात सोडण्यावरून शासकीय यंत्रणेमध्ये वाद
नागरिकांच्या जीवितेला धोका असल्याचे   मगर परत वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडू नये अशी विनंती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली परंतु सुरुवातीला त्यांनी मान्य केली नाही. परंतु लोकांमध्ये घबराट पसरू नये आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फेरविचार करण्याची विनंती केल्यानंतर वन विभागाने दुसऱ्या अधिवासात मगरीला सोडण्याचे मान्य केले.
वीरेश राऊत
शाखा अभियंता वरसगाव धरण, वेल्हे.


पाणी कमी झाल्यावर उन्हाळ्यात मगर पाण्याबाहेर आल्याचे अनेकदा दिसली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट असते. पहाटे मगर पकडली असली तरी अजून अनेक मगरी धरणात असाव्यात.
देविदास हाणमघर,  सरपंच साईव बुद्रुक तालुका वेल्हे ( राजगड)
 
मगरींचा अधिवास असल्याचे स्पष्ट खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत मगरी दिसून येत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिक सातत्याने करत आहेत. खडकवासला धरणाच्या मागे काही वर्षांपूर्वी मगर आढळून आली होती. तसेच खानापूर येथील पाणवठ्याजवळ मगरीचे पिल्लू आढळून आले होते. आता वरसगाव धरणाच्या भिंतीवर महाकाय मगर आढळून आल्याने धरण साखळीत मगरींचा अधिवास असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात येणारे पर्यटक, स्थानिक नागरिक यांच्या माहितीसाठी व सुरक्षिततेसाठी वन विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

See also  मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले पालखीचे दर्शन