घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे ज्येष्ठ निरुपणकार हरपले -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २६ :-ओघवती रसाळ वाणी आणि मार्मिक शैलीने घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे, भागवत धर्माचे वैश्विक राजदूत, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे निधन महाराष्ट्राच्या भागवत आणि भक्ती संप्रदायासाठी मोठी हानी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ कीर्तनकार श्री बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, बाबा महाराजांची रसाळ वाणी, निरूपणाची आगळी शैली कर्णमधुर होती. त्यांनी कीर्तन- निरूपण आणि भजन सातासमुद्रापार पोहचवले. बाबा महाराज यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे या संप्रदायातील अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारा आधारवड अशा स्वरूपाचा विठ्ठल भक्त चिरशांत झाला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी श्री बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

See also  सायबर कॉमिक बुकचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते अनावरण