जागतिक स्नुकर अजिंक्यपद २०२४ स्पर्धेत पुण्यातील आरव संचेती याची निवड !!

पुणे :  आंतरराष्ट्रीय बिलीयर्डस् आणि स्नुकर फेडरेशन (आयबीएसएफ) जागतिक १७ आणि २१ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद २०२४ स्पर्धेसाठी पुण्यातील आरव सचिन संचेती याची निवड झाली आहे. जागतिक स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकमेव खेळाडू म्हणून निवड झालेला १३ वर्षीय आरव हा सर्वात लहान वयाचा खेळाडू असून स्पर्धेमध्ये सहभागी होणार्‍या भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

आयबीएसएफ जागतिक १७ आणि २१ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद २०२४ स्पर्धा बंगलोर येथे येथे २४ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी आरवसह भारतीय संघातून जबेझ नविन कुमार, राहूल विल्यम्स्, शाम ऑल्विन आणि भाव्य पिपलिया यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांमध्ये १३ वर्षाचा आरव हा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. आरव १७ आणि २१ वर्षाखालील या दोन्ही गटांमध्ये आपले कौशल्य पणाला लावणार आहे.

आरव संचेती हा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्नुकर आणि बिलीयर्डस्पटू सचिन संचेती यांचा मुलगा असून आपल्या वडीलांप्रमाणेच त्याने या क्यु स्पोटर्स प्रकारात आपली गुणवत्त सिद्ध केली आहे. भारतीय (राष्ट्रीय) सब-ज्युनिअर स्नुकर गटात क्रमांक ४ तसेच महाराष्ट्र (राज्यस्तरीय) सब-ज्युनिअर आणि ज्युनिअर स्नुकर गटात क्रमांक २ असे आरवचे सध्याचे मानांकन आहे.

आरव हा यासिन मर्चंट यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील यासिन मर्चंट स्नुकर अ‍ॅकॅडमी येथे प्रशिक्षण घेतो. तसेच पीवायसी हिंदू जिमखाना आणि अ‍ॅमेरोना फन क्लब येथे सराव करतो. हडपसर येथील ग्लोबल इंडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरव ८ वी इयत्तेमध्ये शिकत आहे. आयबीएसएफ जागतिक १७ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद २०२३ स्पर्धेमध्येसुद्धा आरव सहभागी झाला होता. ही स्पर्धा रियाध, सौदी अरेबिया येथे झाली होती.

See also  मनसे उमेदवार किशोर शिंदे यांचा सकाळी उद्यानांमध्ये फिरावयास आलेल्या नागरिकांच्या भेटीगाठींवर भर