सहकार चळवळीचा गुणात्मक विकास होण्यासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण द्यावे-महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे

पुणे, दि. १३ : राज्यात सहकार चळवळीचा गुणात्मक विकास होण्यासाठी राज्यामध्ये सहकारी क्षेत्राशी निगडीत व्यक्तिंना उच्च दर्जाचे सहकारी शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात सहकार प्रशिक्षण केंद्राचे ‘सहकार महर्षी साहेबराव सातकर सहकार प्रशिक्षण केंद्र’ नामकरण समारंभात श्री. मोरे बोलत होते. यावेळी अपर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, राज्य सह संघाचे उपाध्यक्ष हिरामण सातकर, मानद सचिव विद्या पाटील, पुणे ग्रामीण सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, पुणे जिल्हा सहकारी बोर्डचे उपाध्यक्ष रतन हेगडे, राज्य सह संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली रावळ-ठाकूर, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील आदी उपस्थित होते.

श्री. मोरे म्हणाले, राज्य सहकारी संघाचे राज्यात एकूण 13 सहकार प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यामध्ये 1 जुलै 1947 रोजी पुणे व रायगड जिल्ह्यासाठी पुणे येथे स्थापन झालेल्या केंद्राचा समावेश आहे. माजी आमदार सहकार महर्षी स्व. साहेबराव सातकर यांचा राज्यातील अनेक सहकारी संस्थांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. सहकारी शिक्षण प्रशिक्षण हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते. साहेबराव सातकर यांच्या सहकारातील अलौकीक कार्याच्या स्मृती चिरंतन राहव्यात या हेतूने येथील प्रशिक्षण केंद्राचे नामकरण ‘सहकार महर्षी साहेबराव सातकर सहकार प्रशिक्षण केंद्र’ असे करण्यात येत आहे.

सहकार चळवळीची भरभराट होण्यासाठी सहकाराचे शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. सद्या माध्यमांचे स्वरूप बदलले आहे. त्यामध्ये सहकार क्षेत्राने टिकण्यासाठी आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. सर्व संस्थांच्या संचालक मंडळाने यावर विचार करुन संस्थेच्या भरभराटीसाठी प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांना सहकार विषयाची आवड निमार्ण व्हावी, याकरीता महाविद्यालयीन स्तरावर सहकार शिक्षण देणे गरजेचे आहे. प्रत्येक विभागस्तरावर प्रशिक्षण वर्गाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

अपर निबंधक श्री. वाडेकर म्हणाले, स्व. साहेबराव सातकर यांच्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला वैभव प्राप्त झाले. सहकारी चळवळ वाढली पाहिजे, तिची भरभराट झाली पाहिजे यासाठी स्व. सातकर यांनी काम केले. समाजाचा सहकाराच्या माध्यमातून विकास करायचा असेल तर सहकारी शिक्षण प्रशिक्षणाची अत्यंत गरज आहे या त्यांच्या मतानुसार गेली १०६ वर्षे सहकारी संघ काम करत आहे.

यावेळी प्रा. दुगार्डे, श्री. बुट्टे पाटील, श्री. सातकर व श्रीमती पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

See also  देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल हे स्वागत करण्याजोगे आम आदमी पार्टी