श्री उमांगमलज रथातून ‘दगडूशेठ’  गणपतीची मिरवणूक

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री उमांगमलज रथामध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

यंदाची प्रतिकृती असलेल्या जटोली शिवमंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. श्री उमांगमलज रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती असणार आहे. त्याच्या बाजूला त्रिशूळ आणि डमरु देखील आहे. कळस म्हणून मोठा रुद्राक्ष दाखविण्यात आला आहे. नागाच्या फण्यावर हा तोललेला आहे, बाजूला २१ छोटे कळस लावण्यात आले आहेत. तर, रथावर २३ नंदींचे चेहरे बसविण्यात आले आहेत. तसेच रथावर तब्बल १८ क्रिस्टलचे झुंबर लावण्यात येतील.

रथावर ८ खांब साकारण्यात आले आहेत. प्रत्येक खांबांवर बेलाच्या पानांचे डिझाईन साकारण्यात आले आहे. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २४ फूट इतकी आहे. रथावर एलईडी व पार लाईटचे फोकस लावण्यात येणार आहेत. रथामध्ये बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होणार आहेत. तेथे मोराचे डिझाईन देखील साकारण्यात आले आहे. युवा कलादिग्दर्शक विराज खटावकर यांनी हा रथ साकारला आहे.

सांगता मिरवणुकीबाबत माहिती देताना माणिक चव्हाण म्हणाले, मिरवणुकीत रुग्णसेवा रथ अग्रभागी असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरुन केली जाणार आहे. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-ताशा पथक, सनई-चौघडा असा लवाजमा असेल. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.दुपारी ४ च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल.

See also  ऍमेझॉन आणखी ९००० कामगारांना कामावरून कमी करणार.