वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम

पुणे: पर्यावरण क्षेत्रात काम करणारी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ‘प्रीलव्हड इको हाट’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरवात पुण्यातील नामवंत व्हीके ग्रुपच्या कर्मचारांनी केली. ‘प्रीलव्हड इको हाट’ या उपक्रमाद्वारे आपल्याकडील वस्तू जी वापरात नाही पण ती इतर कोणी वापरण्यायोग्य असेल तर ती ह्या प्रदर्शनामध्ये ठेवली जाते. त्यामुळे वापरलेल्या उत्पादनांची, कपड्यांची अदलाबदल, विक्री आणि दान एकाच व्यासपीठावर होणे शक्य असते. बोर्ड गेम्स, पुस्तके, शूज, ज्वेलरी, शो पिसेस आणि कपड्यांपासून ते बॅग, पर्स आणि पेंटिंगपर्यंत, अनेक वस्तू या प्रदर्शनात आहेत. सेनापती बापट रोडवरील व्हीके ग्रुपच्या कार्यालयात दर महिन्याच्या चौथ्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारी या वस्तू प्रदर्शित केल्या जातात. या उपक्रमास खूप चांगला प्रतिसाद मिळत असून तापर्यंत या प्रदर्शनाद्वारे २३० हुन अधिक वस्तुंची देवाणघेवाण झाली आहे. हा उपक्रम केवळ वापरलेल्या वस्तूंची अदलाबदल करणे, विक्री करणे किंवा देणगी देण्याबद्दल नव्हे तर एक अर्थपूर्ण मार्गाने टिकाऊपणा स्वीकारण्यासाठी एकत्र येण्याबद्दल आहे.

सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजच्या ट्रस्टी पूर्वा केसकर, अनघा परांजपे पुरोहित, ह्रिषीकेश कुलकर्णी, अपूर्वा कुलकर्णी, विजय साने, अमोल उंबरजे तसेच व्हीके ग्रुपच्या वैशाली आठवले व मेघना पिंगळे यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जातोय.

सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजच्या ट्रस्टी अपूर्वा कुलकर्णी म्हणाल्या की, पर्यावरणासाठी एक पाऊल पुढे जाऊन आम्ही ह्या उपक्रमाची सुरवात केली. पूर्वी भारतात वस्तूंची देवाणघेवाण खूप होत असे, आपण दुकानदाराकडे साड्या देऊन भांडी घ्यायचो, मोठ्यांचे कपडे छोट्या भावंडांना वापरायला दयायचो, धान्य देऊन किराणा माल घ्यायचो. त्यामुळे सर्व वस्तूंचा पुनर्वापर होत असे. सस्टेनेबिलिटी घराघरात राबवली जाई. याची एक समांतर अर्थव्यवस्था होती. ही संस्कृती टिकून रहावी यासाठी आम्ही आमच्या ऑफिस मध्ये ह्या उपक्रमाची सुरवात केली. आपल्याला आवश्यक नसलेल्या वस्तूंना नवीन जीवन देऊन, आपण एकत्रितपणे कचरा कमी करू शकतो आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करू शकतो.

कर्मचाऱ्यांमध्ये शाश्वत मानसिकता निर्माण करण्यासाठी प्रीलव्हड इको हाट सारखे उपक्रम महत्त्वाचे आहेत. आमच्यासाठी एकत्र येण्याची, एकमेकांना आधार देण्याची आणि आमच्या शाश्वतता उद्दिष्टांमध्ये योगदान देण्याची ही एक उत्तम संधी आहे. अश्या प्रकारचे उपक्रम अनेक कार्यालयामध्ये राबविले पाहिजे. हे उपक्रम जर आपल्या कोणत्या ऑफिस मध्ये सुरु करावयाचे असल्यास आम्ही सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजच्या माध्यमातून सहकार्य करू असे आयोजक सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजचे अमोल उंबरजे आणि व्हीके ग्रुपच्या वैशाली आठवले व मेघना पिंगळे यांनी सांगितले.

See also  कोथरूड मध्ये बोलबाला, महाविकास आघाडीचे तिकीट कोणाला?