वारकरी कीर्तनाचा शहरात प्रसार व्हावा -वारकरी कीर्तन महोत्सवातील मत

पुणे – वारकरी कीर्तनाचा प्रसार शहरी भागात व्हावा, याकरिता वारकरी कीर्तन महोत्सव आयोजित करून शहरात वारकरी कीर्तनाचा प्रसार केला जावा, असे मत वारकरी कीर्तन महोत्सवात व्यक्त करण्यात आले.

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त दिनांक २८, २९ सप्टेंबर रोजी वारकरी कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात श्री.ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी (आळंदी देवाची) चे विश्वस्त ह.भ.प. डॉ.भावार्थ महाराज देखणे आणि श्री. एकनाथ महाराज यांचे १४वे वंशज ह.भ.प.योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांची कीर्तने झाली. कीर्तनाला साथ संगत आळंदी देवाची येथील श्री. ज्ञानदेव सूरगंधर्वम् गुरूकुलम् संस्थेच्या वादकांनी केली. या सर्वांचे सत्कार देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, कार्याध्यक्ष जयंत देशपांडे आणि मुख्य चिटणीस सुनील पारखी यांनी केले.

श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे २०२३-२४ साल हे ४२५वे वर्ष आहे आणि श्री एकनाथी भागवताचे ४५०वे वर्ष आहे. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था श्री संत एकनाथ महाराजांचा आदर्श ठेवून स्थापन करण्यात आली. या संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष यंदाच साजरे होत आहे. हा चांगला योगायोग आहे, असे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी यांनी कीर्तनकारांच्या सत्कार प्रसंगी बोलताना सांगितले.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वारकरी कीर्तनाचा प्रसार झालेला आहे. अनेक गावांमध्ये नीत्यनेमाने वारकरी कीर्तने होत असतात. वारकरी कीर्तन ही महाराष्ट्राची परंपरा आहे. या परंपरेचा प्रसार शहरी भागातही व्हायला हवा. याकरीता वारकरी कीर्तन महोत्सव व्हावेत असे मत ह.भ.प.योगीराज  गोसावी -पैठणकर आणि ह.भ.प. डॉ.भावार्थ देखणे यांनी व्यक्त केले.

See also  हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार