आपल्यातून कोण गेले त्याची चिंता करू नका, अरे आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली! – शरद पवारांची साद

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आपल्यातून कोण गेले त्याची चिंता करू नका. जे गेले त्यांना सुखाने त्याठिकाणी राहू द्या. आपण एकत्र आहोत. त्या सामूहिक शक्तीतून नवीन, कर्तृत्ववान अशा सहकाऱ्यांची पिढी उद्या महाराष्ट्रात उभी करूया, असे आवाहन शरद पवार साहेबांनी बैठकीत कार्यकर्त्यांना केले.
उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली! अशी साद त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घातली.

सत्ता येते आणि जाते, मात्र केवळ सत्तेतून सुख मिळत नाही. आपल्याकडे ज्या खुर्च्या रिकाम्या झाल्यात त्यावर नवीन लोकांना बसण्याची संधी मिळेल. आपण नवीन उमेदीने कामाला लागूया. महाराष्ट्राची जनता याच योद्ध्यामागे उभी राहाते हे अनेकदा महाराष्ट्राने दाखवले आहे, ते पुन्हा एकदा आपल्याला करायचे आहे. ज्यातून ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आणि चिन्हं आपल्याकडे राहील. आपल्या पक्षाचा एकच शिक्का आहे त्याचे नाव हे शरद पवार आहे, असे पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी सांगितले .

आगामी निवडणुका कधीही येऊ शकतात. पवार साहेबांच्या मागे सामान्य माणसे उभी आहेत. आपण पवार साहेबांना सक्षम असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार करून दाखवूया, यासाठी कामाला लागूया, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले.

तुम्हाला निवडून आणण्यासाठी तोंडातून रक्त गळत असतानाही प्रचारासाठी उभ्या राहिलेल्या बापाला इतकं दुःख देता. ज्याला गुरु बोलायचे त्यालाच दुःख द्यायचे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही पवार साहेबांना जखमी करून टाकलंय. पण हा जखमी शेर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जे आमदार पवार साहेबांसोबत आहेत ते वाचतील अन्यथा इतर सर्व घरी जातील, असा स्पष्ट इशारा पक्षाचे प्रतोद आ. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला.

या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, खासदार डॉ. फौजिया खान, खा. डॉ. अमोल कोल्हे, खा. पी. पी. मोहम्मद फैजल, ज्येष्ठ नेते आमदार अनिल देशमुख, आमदार एकनाथराव खडसे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सुनील भुसारा, महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  टिंबर मार्केट येथील आगीच्या घटनास्थळाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

यावेळी आ. रोहित पवार, आ.राजेंद्र शिंगणे, आ.अशोक पवार, आ.किरण लहमटे, आ.प्राजक्ता तनपुरे, आ.बाळासाहेब पाटील, आ. चेतन विठ्ठल तुपे, आ. राजेश टोपे, आ.संदीप क्षीरसागर, आ. अरुण लाड आदी आमदार उपस्थित होते.