महात्मा गांधी जयंतीनिमित्त सूतकताई प्रात्यक्षिक गरूड गणपती मंडळाचा अनोखा उपक्रम

पुणे – महात्मा गांधी जयंतीनिमित्त नारायण पेठेतील श्री गरूड गणपती मंडळाने दोन दिवस सूतकताई प्रात्यक्षिक उपक्रम राबविला. त्यात ५० तरुण, तरुणींनी सूतकताईचे प्रशिक्षण घेतले.

महात्मा गांधी जयंतीदिनी दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुनील कुंजीर, कार्याध्यक्ष कैलास कांबळे, गरूड गणपती ट्रस्टचे अध्यक्ष मयूर कडू आणि गांधी भवन ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

सूतकताई उपक्रमासाठी गांधी भवन ट्रस्टने  चार चरखे उपलब्ध करून दिले होते. शिवाय प्रशिक्षकही नेमले होते. ५० तरुण, तरुणींनी उत्स्फूर्तपणे सूतकताईचे शिक्षण घेतले. काही लहान मुलांनाही सूतकताईची माहिती देण्यात आली.

या उपक्रमाकरीता मंडळाच्या गणपती मंदिरासमोर बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. सूतकताईची माहिती देणारा फलक लावला होता. कापसाचा धागा काढण्यापासून कापड बनवण्यापर्यंतच्या प्रक्रियेची माहिती देणारे छोटे प्रदर्शन मांडले होते. वातावरण निर्मितीसाठी देशभक्तीपर गाणी लावण्यात आली होती. परिसरात सर्वत्र स्वच्छता ठेवली होती.
मंडळाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची प्रशंसा आमदार धंगेकर यांनी केली.

See also  स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांचे वडील महादेव एकनाथ निम्हण यांचे दु:खद निधन