कोथरूड : कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता अधिक शिगेला पोहोचलेली असून शिवसेना पक्षातून कोणाच्या पारड्यात उमेदवारीचे दान पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोथरूड विधानसभा मतदार संघामधून शिवसेना पक्षाकडून पुणे महानगरपालिकेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे प्रबळ दावेदवार मानले जात आहेत. तर भाजपाचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधात पक्षाकडे प्रबळ दावेद्वारे ठोकत तिकीट मागणारे माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांची भूमिका देखील अद्याप स्पष्ट झालेली नाही.
महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याचाच बोलबाला सध्या कोथरूड मतदार संघामध्ये जास्त पाहायला मिळत आहे. यामुळे भाजपाने कोथरूड मतदार संघातील उमेदवारी जाहीर करून उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचारात आघाडी घेतली असली तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या स्पर्धेमुळे मतदार संघाचे उमेदवार कोण याकडे लक्ष वेधले गेले आहे.
कोथरूड मध्ये स्थानिकतेच्या मुद्द्यावर यंदाच्या निवडणुकीमध्ये अधिक प्रभाव प्रचारा दरम्यान दिला जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार व अमोल बालवडकर हे कोथरूड मतदार संघातील स्थानिक उमेदवार म्हणून समोर येत असून मुळशीकरांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी कोणाला तिकीट देणार ही बाब अधिक महत्त्वाची ठरणार आहे.