धायरी : धायरी येथील शिवकालीन अंबाईमाता देवीचा नवरात्रोत्सव यंदा पारंपरिक आणि ऐतिहासिक पद्धतीने भव्यतेने सुरू झाला आहे. गावाजवळील डोंगराच्या कुशीत असलेल्या मंदिरात भाविकांसाठी दर्शन मंडप, पाणी आणि अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
शिवकाळापासून साडेतीनशे वर्षांपासून देवीच्या नवरात्र उत्सवाची परंपरा कायम आहे. देवीची मूर्ती दगडी पाषाणाची असून, मंदिर परिसर जागृत देवस्थान म्हणून ओळखला जातो. यंदा उत्सव भव्य दिव्यांच्या प्रकाशात, फुलांच्या सजावटीत आणि पारंपरिक विधींपद्धतीने साजरा केला जात आहे.
सर्व जाती-धर्माचे भाविक उत्सवात सहभागी होत आहेत. देवस्थानाचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी सांगितले की, या नवरात्र उत्सवात आरती, जागर, प्रवचन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली असून, भाविकांना प्रसन्न वातावरण अनुभवता येईल.
नवरात्रोत्सवाची तयारी ग्रामस्थ आणि देवस्थानाचे विश्वस्त यांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आली आहे. त्यात अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, विश्वस्त चंद्रकांत वांजळे, भाऊसाहेब कामठे, सोमनाथ भोसले, सोपान लायगुडे, बाजीराव चौधरी, हिरामण पोकळे, बाळासाहेब कामठे, किरण पोकळे, सागर पोकळे यांचा समावेश आहे.
























