कबुतरांपासून उद्भवणाऱ्या समस्या: आरोग्यासाठी गंभीर धोका आणि प्रतिबंधात्मक उपाय

कबुतरं ही माणसांच्या शहरी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहेत. त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि उघड्यावर सहज अन्न मिळाल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते. धार्मिक श्रद्धा आणि कबुतरांना अन्न टाकण्याच्या सवयी यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळते. मात्र, या पक्ष्यांमुळे श्वसनसंस्थेशी संबंधित अनेक गंभीर आजार होऊ शकतात. कबुतरांच्या पिंता आणि विष्ठेतून होणाऱ्या आजारांबाबत पुणे महानगरपालिका सातत्याने इशारे देत आहे. कबुतरांची अनियंत्रित संख्या आता सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका बनली आहे.

*कबुतरांपासून होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या*

कबुतरांच्या पिंता आणि विष्ठेमध्ये सूक्ष्म जीवजंतू, प्रथिने, आणि फफुंदीजन्य घटक असतात, जे हवेत मिसळून श्वसनमार्गातून शरीरात जातात. हे कण अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरतात:

1. हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया (HP): हा आजार कबुतरांच्या विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म कणांमुळे होतो. फुफ्फुसांवर परिणाम करणारा हा आजार दीर्घकालीन आणि गंभीर असतो. पुणे महानगरपालिकेच्या अहवालानुसार, श्वसनविकारांनी ग्रस्त नागरिकांमध्ये HP आजार होण्याचे प्रमाण 60-65% आहे.


2. एलर्जी आणि दमा: कबुतरांच्या पिंतात असलेल्या प्रथिनांमुळे श्वसनमार्गात सूज येते, ज्यामुळे दमा आणि एलर्जी होऊ शकते.


3. त्वचाविकार: कबुतरांच्या संपर्कामुळे काही व्यक्तींना त्वचेला खाज, पुरळ, किंवा चट्टे येण्याची तक्रार असते.


4. जीवाणूजन्य आणि फफुंदीजन्य संसर्ग: कबुतरांच्या विष्ठेमुळे सैल्मोनेलोसिस आणि क्रिप्टोकोकोसिस यांसारख्या आजारांचा धोका असतो.


5. श्वसनाचे दीर्घकालीन विकार: सतत कबुतरांच्या संपर्कात राहणाऱ्या लोकांना दीर्घकालीन श्वसन समस्या होऊ शकतात, ज्यामुळे जीवनशैलीत मोठा अडथळा निर्माण होतो.



*पुण्यातील वाढती समस्या*

पुणे शहरात कबुतरांची संख्या वेगाने वाढत आहे. उघड्यावर अन्न टाकण्याच्या सवयीमुळे आणि त्यांच्या पोषणासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यामुळे त्यांच्या वावरात मोठी वाढ झाली आहे.

सार्वजनिक ठिकाणी, सोसायट्यांमध्ये आणि व्यस्त रस्त्यांवर कबुतरांचे मोठे थवे दिसून येतात.

त्यांच्यामुळे पिंता आणि विष्ठेचे प्रमाणही वाढले आहे, ज्यामुळे शहरातील हवेचा दर्जा खराब होतो.

या समस्यांमुळे पुणे महानगरपालिकेला शहरातील स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे लागत आहे.


*महानगरपालिकेच्या उपाययोजना*

पुणे महानगरपालिका या समस्येवर प्रभावीपणे काम करत आहे. त्यांनी खालील उपाययोजना हाती घेतल्या आहेत:

1. कबुतरांना अन्न टाकण्यावर बंदी: कबुतरांना उघड्यावर अन्न टाकणे हा त्यांची संख्या वाढवण्याचा प्रमुख घटक असल्याने, महापालिकेने अशा कृतींवर कडक बंदी घातली आहे.


2. दंडात्मक कारवाई: जर कोणी अन्न टाकताना आढळले, तर संबंधित व्यक्तींवर दंड आकारण्याचा आदेश दिला आहे.


3. आरोग्यविषयक जनजागृती: नागरिकांना कबुतरांपासून होणाऱ्या आजारांविषयी माहिती देण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत.


4. सार्वजनिक स्वच्छता मोहिमा: शहरातील कबुतरांच्या विष्ठेचे प्रमाण कमी करण्यासाठी स्वच्छता मोहिमा राबवल्या जात आहेत.



*नागरिकांची जबाबदारी*

महानगरपालिकेच्या सूचनांचे पालन करणे आणि कबुतरांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

1. खाद्य टाकणे टाळा: कबुतरांना उघड्यावर अन्न देऊ नका.


2. घर आणि परिसर स्वच्छ ठेवा: कबुतरांचे घरटे तयार होणार नाही, याची खबरदारी घ्या.


3. आरोग्यविषयक सावधानता: कबुतरांच्या संपर्कात येण्यापासून बचाव करण्यासाठी मास्क घाला.


4. डॉक्टरांचा सल्ला घ्या: श्वसनाचे कोणतेही त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

*धार्मिक आणि भावनिक दृष्टिकोन*
कबुतरांना अन्न टाकणे ही धार्मिक श्रद्धांशी संबंधित कृती असते. मात्र, सार्वजनिक आरोग्यासाठी याचा त्रास होतो. त्यामुळे श्रद्धा पाळतानाही आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. कबुतरांना अन्न टाकण्याऐवजी अन्य पर्याय शोधणे योग्य ठरेल.

कबुतरांपासून होणाऱ्या समस्यांवर प्रतिबंध लावणे ही आजची गरज आहे. पुणे महानगरपालिकेच्या आदेशांचे काटेकोर पालन करून आपण आपल्या आरोग्याचे रक्षण करू शकतो. नागरिकांनी स्वच्छता राखून आणि कबुतरांच्या संपर्कात येण्यापासून बचाव करून या समस्येवर तोडगा काढावा. आरोग्य टिकवा, कबुतरांना उघड्यावर अन्न टाकणे थांबवा!
*लेखक:* प्रा. योगेश अशोकराव हांडगेपाटील , कात्रज, पुणे.
मोबाईल नंबर 9423077963

See also  येरवडा कारागृहात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ परिषदेचे आयोजन