पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘कमवा आणि शिका’ योजनेचा शुभारंभ

‘कमवा आणि शिका’ योजनेच्या अंलमबजावणीसाठी लवकरच नवे धोरण-पालकमंत्री

पुणे : यशस्वी स्किल्स सोबत इतरही संस्थांना ‘कमवा आणि शिका योजना’ राबविता यावी यासाठी लवकरच धोरण आणले जाईल आणि त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येईल. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव या योजनेला देण्याचा मानस आहे. यशस्वीने या योजनेचे आदर्श मॉडेल तयार करावे आणि उद्योगांनी योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

हॉटेल जेडब्ल्यु मेरिएट येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि यशस्वी स्किल्स लि. तर्फे आयोजित ‘कमवा आणि शिका’ योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार राजेश टोपे, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, यशस्वी ग्रुपचे चेअरमन विश्वेश कुलकर्णी, प्रतापराव पवार, राजेश पांडे, टाटा मोटर्सचे व्यवस्थापन सल्लागार गजेंद्र चंदेल आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणाला महत्व दिले आहे. जीवनाला उपयोगी पडणारे शिक्षण आणि कौशल्य शिक्षणावर भर या धोरणाचा गाभा आहे. मातृभाषेतून शिक्षण हा त्यातील तेवढाच महत्वाचा भाग आहे. विषयाची समज येण्यासाठी आणि संशोधनाच्यादृष्टीनेही मातृभाषेतील शिक्षणाला महत्व आहे. देशात पाश्चात्य देशांच्या तुलनेत संशोधनाचे प्रमाण कमी असून ते वाढविण्याची गरज आहे. म्हणून शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.

शासनाने कौशल्य विकास विद्यापीठ स्थापनेचा निर्णय घेतला. या विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे. तसेच राज्यातील शिक्षण संस्थांनी कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम सुरू करावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षापासून कौशल्य विकासाला चार क्रेडीट पॉइंट ठेवण्यात येणार असून ते पदवी मिळविण्यासाठी बंधनकारक ठेवण्यात आले आहेत. तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी उद्योगांसमवेत बैठक घेऊन अभ्यासक्रमात आवश्यक बदल करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

माजी मंत्री श्री.टोपे म्हणाले, ‘कमवा आणि शिका’ योजनेला शासनाने अधिक व्यापक स्वरुप दिले आहे. एकीकडे सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या वाढते आहे, रोजगाराचा मोठा प्रश्न शिक्षण क्षेत्रासमोर उभा आहे. या आव्हानावर उपाय शोधणे गरजेचे होते. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण न घेतल्याने रोजगार मिळविता येत नाही ही दुसरी बाजू आहे. या दोन्ही प्रश्नांची सोडवणूक या योजनेच्या माध्यमातून करता येणे शक्य आहे. उद्योग जगतालादेखील स्पर्धात्मक युगात कमी खर्चात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे दोन्ही घटकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ होणार आहे.

See also  महाविकास आघाडीला तख्त मिळू देणार नाही – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

डॉ.मोहितकर म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी राज्यपातळीवर सुरू करण्यात आली आहे. ‘कमवा आणि शिका’ योजना सुरूवातीच्या काळात ५ अभ्यासक्रमासाठी सुरू केली होती. त्यात वाढ करून १९ अभ्यासक्रमांनी ही योजना सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या धोरणानुसार याचा अभ्यासक्रम निर्धारीत करण्यात येणार आहे. शिकत असतानाच उद्योगांना अपेक्षित अभ्यासक्रमाची पदविका विद्यार्थ्यांना मिळविता येणार आहे. उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आणखी अभ्यासक्रमाची भर घालण्याची शासनाची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी आणि उद्योग अशा दोघांनी या योजनेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. उद्योगांनी या विद्यार्थ्यांची नीट काळजी घेऊन त्यांच्या प्रगतीला हातभार लावावा. या योजनेबाबत जागरुकता आणण्याचा प्रयत्न करावा. या योजनेच्या माध्यमातून चांगले व्यक्तिमत्व तयार होतील, असेही ते म्हणाले.

श्री.पवार म्हणाले, युवकांमधील गुणवत्तेचा शोध घेऊन त्यांना प्रशिक्षण देणे गरजचे आहे. देशाची प्रगती साधण्याची क्षमता युवकांमध्ये निर्माण करण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत. समजाच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमात शासन आणि उद्योगांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.

श्री.चंदेल म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून जीवन कौशल्ये देण्यात आली तर ते चांगल्या उत्पादनाचा विचार करू शकतील आणि जीवनात यशस्वी होतील. उद्योगांसाठी ही एक चांगली संधी असून शासनाच्या प्रयत्नांना उद्योगांनी समाजाप्रती जबाबदारी म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कामगार विषयक कायद्याचे तज्ज्ञ ॲड.आदित्य जोशी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. शासनाने योजना आखताना विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आठव्या संशोधन पुस्तिकेचे आणि न्यूज लेटरच्या पुणे चॅप्टर १३ व्या आवृत्तीचे प्रकाशन पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.