पुणे : -क्रंची रोलच्या सौजन्याने आयोजित मारुती सुझुकी अरीना पुणे कॉमिक कॉन २०२५ ने पुणेकरांना या वर्षातील सर्वोत्तम ब्लॉकबस्टर वीकेंडची पर्वणी दिली आहे. अविस्मरणीय आठवणींसह हा कार्यक्रम संपूर्ण शहराला पॉप कल्चरच्या भव्य उत्सवात न्हाऊन काढणारा ठरला. पुण्यासह विविध भागांतून आलेल्या चाहत्यांना या दोन दिवसीय उत्सवाने नॉन-स्टॉप मनोरंजनासह, खास चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी आणि इंडस्ट्रीतील नामांकित ब्रँड्सच्या आकर्षक अनुभवांसाठी एकत्र आणले. दोन दिवसांत २२,००० हून अधिक लोकांनी या उत्सवाला भेट दिली आणि १५०० पेक्षा जास्त लोकांनी कोस्प्ले मध्ये सहभाग घेतला ज्यामुळे हा एक नेत्रसुखद आणि उत्साही अनुभव ठरला.
या कॉमिक कॉनमध्ये चाहत्यांनी वेगवेगळ्या पात्रांचे वेष परिधान केले होते.
डेडपूल, कॅप्टन अमेरिका, डेअरडेविल, ग्रीन गॉब्लिन तसेच विविध प्रकारच्या स्पायडर-मॅनसारख्या सुपरहिरोंपासून ते फ्लिंटस्टोन्स, टीम रॉकेट, जास्मिन, मोआना आणि माउई यांसारख्या लोकप्रिय पात्रांचे रंगतदार कोस्प्ले केले. तसेच चेनसॉ मॅन, अकाशुकी (नारुटो), रेंगोकू आणि तंजीरो (डेमोन स्लेयर) या अॅनिमे पात्रांचेही उत्साही आणि सर्जनशील कोस्प्ले पाहायला मिळाले. पुणे कॉमिक कॉनने काही प्रसिद्ध कॉमिक बुक निर्मात्यांना या उत्सवासाठी आमंत्रित केले होते, ज्यामुळे हा विकेंड कॉमिक प्रेमींसाठी स्वप्नवत ठरला. पुरस्कार विजेते ‘आर्ची कॉमिक्स’ लेखक डॅन पॅरेंट यांची उपस्थिती चाहत्यांसाठी खास आकर्षण ठरली. त्यांनी आपल्या खास पॅनल आणि भेटीगाठीच्या सत्रांमध्ये त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचे अनुभव, कथाकथन तंत्राबद्दल माहिती आणि कारकिर्दीतील गमतीशीर आठवणी शेअर केल्या. त्यांच्यासोबत अभिजीत किणी स्टुडिओज, प्रसाद भट, बुल्सआय प्रेस, इंडसवर्स, बकरमॅक्स, गार्बेज बिन, आर्ट ऑफ सॅविओ, अक्षरा अशोक (हॅपीफ्लफ), सौमिन पटेल, लिलरोश, राजेश नागुलकोंडा, याली ड्रीम क्रिएशन्स, अर्बन टेल्स आणि भारतातील बरेच आघाडीचे कॉमिक बुक निर्माते मंचावर सहभागी झाले.
पुणे कॉमिक कॉनच्या मंचावर सादर करण्यात आलेल्या अविस्मरणीय परफॉर्मन्सेसनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन रोहन जोशी, रवी गुप्ता, साहिल शाह, अजीम बनातवाला आणि राहुल सुब्रमण्यम यांनी त्यांच्या विनोदाने आणि जबरदस्त पंचलाईन्सने प्रेक्षकांना खळखळून हसवले. तसेच लोकप्रिय ‘द इंटरनेट सेड सो’ (टीस) पॉडकास्ट टीम – वरुण ठाकूर, कौतुक श्रीवास्तव आणि आदार मलिक यांनी मंचावर धमाल मस्ती केली. याशिवाय, चाहत्यांचा आवडता अॅकॅपेला ग्रुप ‘व्हॉक्ट्रॉनिका’ यांनी नॉस्टॅल्जिक मेडलीसह ‘तांबडी चांबडी’ यांसारख्या सादरीकरणांनी संपूर्ण वातावरण भारावून टाकले आणि हा दोन दिवसीय वीकेंड पुणेकरांसाठी संस्मरणीय बनवला.
स्टँड-अप कॉमेडियन राहुल सुब्रमण्यम म्हणाले, “हा अनुभव विलक्षण होता. पुणे माझ्या आवडत्या शहरांपैकी एक आहे. मी एक मंबईकर असूनही इथे अनेक वेळा आलो आहे आणि प्रत्येक वेळी हा अनुभव खास असतो. पुणे कॉमिक कॉनमध्ये पहिल्यांदाच मी एक क्विझ शो होस्ट केला आणि हा एक नवीन अनुभव होता. प्रेक्षकांचा उत्साह जबरदस्त होता, ज्यामुळे संपूर्ण अनुभव अधिक मजेदार बनला!”
आंतरराष्ट्रीय कलाकार डॅन पॅरेंट म्हणाले, “पुणे कॉमिक कॉनमधील अनुभव अतिशय अविस्मरणीय आणि जबरदस्त होता. चाहत्यांचा उत्साह आणि प्रेम अफाट होते. आर्ची कॉमिक्समधील पात्र भारतीय वाचकांमध्ये आणि मनामनात किती प्रिय आहे हे पाहून मला खूप आनंद झाला. चाहत्यांना भेटणे, पुस्तकांवर स्वाक्षरी देणे आणि कथा शेअर करणे हा संपूर्ण प्रवास आनंददायी होता. कॉमिक कॉन इंडियाचा मी अतिशय आभारी असून इथे पुन्हा येण्यास उत्सुक आहे!”
भारतीय कलाकार अभिजीत किणी म्हणाले, “पुणे कॉमिक कॉन एकदम भन्नाट होतं. आम्ही या इव्हेंटची वाट पाहत होतो, कारण मुंबईपासून अगदी जवळ असल्याने पुणे आमच्यासाठी दुसऱ्या घरासारखे आहे. पुणेकरांचा प्रतिसाद अप्रतिम आहे. लोकं कॉमिक्सला खूप पसंत करत होते आणि मर्चेंडाईज हातोहात विकले जात आहे. पुणे लय भारी आहे.”
या कॉमिक कॉनमध्ये फॅन्सना विविध ब्रँड्सचे खास अनुभव मिळाले. मारुती सुझुकी अरीना ने चाहत्यांसाठी स्पेशल अनुभव देणारा स्टॉल लावला होता. क्रंची रोलच्या ‘वन पीस’ स्पेशल बूथमध्ये अॅनिमेप्रेमींना जगातील सर्वात लोकप्रिय मालिकेचा अनुभव घेता आला. युनिव्हर्सल स्टुडिओजच्या ‘ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ’ आणि ‘हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन’ बूथने चाहत्यांना एका वेगळ्याच दुनियेत नेलं.नोडविन गेमिंग अरीना मध्ये प्ले स्टेशन, लेनोवो, इंटेल, एलिट हब्स, कॉर्सेअर, लॉजिटेक आणि क्लिप व्हीआर सारख्या ब्रँड्सचे थरारक गेमिंग अनुभव चाहत्यांना मिळाले. विशेषतः, इस्रोच्या चांद्रयान मिशनचा व्हीआर अनुभव घेण्याची संधी चाहत्यांना मिळाली, ज्याने त्यांना थेट अवकाश सफरीचा आनंद दिला.
कॉमिक कॉन इंडिया संस्थापक जतिन वर्मा म्हणाले, “पुणे कॉमिक कॉनने आमच्या हृदयात विशेष स्थान मिळवले आहे! हा आमचा ५० वा कॉमिक कॉन होता आणि इथला प्रतिसाद जबरदस्त होता. पुणेकरांच्या कॉमिक्स, कोस्प्ले आणि पॉप कल्चरसाठी असलेल्या प्रेमामुळे हा अनुभव अद्वितीय ठरला. महाराष्ट्रभरातून कोस्प्लेअर्सचा उत्साह आणि सर्जनशीलता पाहून खूप प्रेरणादायी वाटले. पुणेचा हा उत्साह कायम राहो आणि पुढच्या वर्षांत हा सोहळा आणखी मोठा होवो, हीच आमची इच्छा आहे”
नोडविन गेमिंगचे सहसंस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी म्हणाले, “पुणे कॉमिक कॉन हा आधुनिक आणि पारंपरिक चाहत्यांचा सुंदर संगम होता. पुण्याच्या कोस्प्ले कम्युनिटीने अप्रतिम प्रतिभा दाखवली. राहुल सुब्रमण्यम, रवी गुप्ता आणि रोहन जोशी यांचे विनोदी सादरीकरण आणि व्हॉक्ट्रॉनिकाच्या जादुई परफॉर्मन्सने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. आम्ही भारतातील कॉमिक कॉनचा अनुभव अधिक प्रगल्भ करत आहोत आणि येत्या वर्षांत हा सोहळा आणखी मोठा करण्यासाठी उत्सुक आहोत.”
पुणे कॉमिक कॉन २०२५ च्या जबरदस्त यशानंतर, संपूर्ण भारतातील चाहत्यांची उत्सुकता आता अहमदाबाद कॉमिक कॉन साठी वाढली आहे. हा कॉमिक कॉन २२ आणि २३ मार्च २०२५ रोजी होणार असून आणखी धमाकेदार असणार आहे.