बालेवाडी : बालेवाडी मधील कायझेन सोसायटी शेजारील रस्त्यावर काल (15 मार्चच्या) रात्री 7-8 युवकांनी लाठ्या आणि तलवारी घेऊन धुमाकूळ घालत रस्त्यावरच्या गाड्यांची तोडफोड करून नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी माहिती कळवताच पोलिसांनी तातडीने धाव घेत रात्रीच दरोडे च्या तयारीत असलेल्या ७ आरोपींना ताब्यात घेतले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप आणि त्यांच्या टीम ने सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दाबडे मार्गदर्शनाखाली तपास मोहीम राबवली आणि काही तासातच आरोपी नाव- सोहम सिद्धेश्वर वाघमारे वय 20 वर्ष रा. महाळुंगे, सत्तार शेख वय 19 वर्ष राहणार बालेवाडी, नाथा शहाजी वाघमारे वय 18 रा. बालेवाडी , ताहीर गुलाब मुलतान वय 19 वर्ष रा. पाटील वस्ती बालेवाडी, सुमित भीमराव गायकवाड वय 19 वर्ष रा. महाळुंगे, तुकाराम पांडुरंग इचके वय 19 वर्ष रा. मातोबा नगर पुणे, व एक वय 17 वर्ष मातोबा नगर ( विधी संघर्ष ग्रस्त बालक ) यांना पोलिसांनी जेरबंद केले.
गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले २७ इंचाचे पाते असलेले ०१ लोखंडी धारदार शस्र, ११ इंचाचे पाते असलेले ०१ लोखंडी हत्यार, मिरची पूड, सुतळीचा बंडल, चिकटपट्टी आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ताब्यात घेतलेल्या सहा आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. मागच्याच आठवड्यात बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे आयोजित पोलिस- नागरीक संवाद कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी “Zero Tolerance to Crime” मोहिमेअंतर्गत बाणेर बालेवाडी प्रभाग “गुन्हामुक्त व भयमुक्त” करण्याची ग्वाही दिली होती. या पार्श्वभूमीवर या कारवाईचे नागरिकांच्या कडून देखील स्वागत व अभिनंदन करण्यात आले.