पुण्यात पावसाने झोडपले; पुणे मनपा आयुक्त व पालिका अधिकारी पावसाळी कामाच्या नावाखाली फसवत असल्याची भावना

पुणे : पुण्यात जोरदार पावसामुळे उपनगरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. पावसाळी गटारांची स्वच्छतेचा दावा करणाऱ्या पुणे महानगरपालिकेचा बुरखा देखील फाटला असून आयुक्तांसह पालिका अधिकारी पुणे करांना राजरोसपणे फसवत असल्याची भावना पुणेकर व्यक्त करत आहेत.

मंगळवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे उपनगरातील अनेक रस्त्यांवर पाणी वाहताना दिसत होते. महत्त्वाच्या रस्त्यावर पाणी वाहत असताना वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठीची यंत्रणा अपयशी ठरत असल्याने पालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्यामध्ये समस्या येऊन देखील कारवाई करत नसल्याचे बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर मुख्य रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने वाहने अडकून पडली होती. बाणेर परिसरातील बिटवाईज चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती तर अनेक दुचाकी बंद पडल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. तर कोथरूड कर्वेनगर परिसरातील मुख्य रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचे लोट वाहत असल्याने वाहन चालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत होती.

पुणे शहरामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पावसाळी गटारांची स्वच्छता योग्य पद्धतीने झाली नसल्याने बाणेर बालेवाडी सारख्या स्मार्ट एरियामध्ये देखील ड्रेनेजच्या झाकणामधून पाण्याचे लोट बाहेर येत होते.

मागील काही पावसाळ्यात मुख्य रस्त्यांवर साठत असलेले पाणी, वाहतुकीला अडथळे ठरणारे प्रवाह याबाबत माहिती असताना देखील कारवाई करण्यात आलेली नाही याला जबाबदार कोण असा प्रश्न पुणेकर उपस्थित करत आहेत.

See also  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘देखो आपला महाराष्ट्र’ टुर पॅकेज जाहीर