पुणे : दिनांक ८ जून २०२५ रोजी ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक सार्वजनिक उद्याने अचानक बंद करण्यात आली, यामुळे मुस्लिम समाजात तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात महाराष्ट्र मुस्लिम काँफरन्सचे अध्यक्ष हाजी जुबैर मेमन यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत या अन्यायकारक निर्णयाविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मुस्लिम समाजासाठी धार्मिक व सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असलेली ठिकाणे — जसे की शनिवारवाडा, सारसबाग इत्यादी — कोणतेही अधिकृत आदेश न देता बंद ठेवण्यात आली. या निर्णयामागे कोणताही ठोस आधार किंवा पूर्वसूचना दिली गेली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आणि संविधानाच्या मूल्यांना छेद देणारे आहे.
विशेष म्हणजे, हा निर्णय खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण एका विशिष्ट धार्मिक समुदायावर लक्ष केंद्रित करणारे असल्याचे ठपके निवेदनात ठेवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र मुस्लिम काँफरन्सने खालील मागण्या केल्या आहेत:
सदर आदेश देणाऱ्या संबंधित अधिकार्यांना तात्काळ निलंबित करावे. या घटनेची स्वतंत्र न्यायिक चौकशी करण्यात यावी. सर्व अधिकार्यांना धार्मिक सहिष्णुता व संविधानिक मूल्यांचे प्रशिक्षण देण्यात यावे. महानगरपालिकेने मुस्लिम समाजाची क्षमा मागावी आणि स्पष्टीकरण द्यावे.
हाजी जुबैर मेमन यांनी सांगितले की, “या प्रकारामुळे केवळ मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत, तर सामाजिक सलोखा व संविधानिक मूल्यांनाही धक्का बसला आहे. आम्ही बाब गांभीर्याने घेत असून योग्य ती कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही.”