योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार

बाणेर : योगीराज पतसंस्थेच्या वतीने दहावीच्या परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक दिलीप फलटणकर, प्राध्यापक दादा शिंदे, श्रीराम समर्थ पतसंस्थेचे संचालक सुधाकर धनकुडे, योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे यांच्या शुभहस्ते बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, मुलांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यायचे हाच यामागील हेतू आहे. प्रत्येक वर्षी 90% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करायचा आणि त्यामधून 25 विद्यार्थी निवडून त्यांना दरमहा शिष्यवृत्ती द्यायची असा उपक्रम आहे. संस्थेची बाणेर शाखा आणि कृष्णा नगर शाखेत एकूण 75 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. आतापर्यंत संस्थेने 165 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. तसेच शिष्यवृत्ती दिलेल्या विद्यार्थ्यांमधून 12 वी च्या परीक्षेत 95% गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुढील उच्च शिक्षणाचा खर्च संस्थेच्या वतीने करणार आहोत. याच बरोबर संस्था विविध प्रकारे करत असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.

माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की, तुम्हाला ज्या क्षेत्रात रस आहे तेच क्षेत्र निवडा. आधुनिकतेचा उपयोग शिक्षणासाठी करा असेही सांगितले. मृगजळाच्या मागे धावू नका, वास्तवतेचा विचार करून निर्णय घ्या.

दिलीप फलटणकर यांनी सांगितले की, मुलांनी पालकांनी दिलेले संस्कार आणि मूल्ये जपणे आवश्यक आहे. पुढील शिक्षण घेत असताना कष्ट आणि प्रामाणिकपणा अंगीकारल्यास यश नक्की मिळेल. जे गुण 10 वी च्या परीक्षेत मिळाले आहेत तेच सातत्य टिकविणे भविष्यात गरजेचे आहे. असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.प्राध्यापक दादा शिंदे यांनी सांगितले की, विविध क्षेत्रात विविध संधी आहेत त्याप्रमाणे क्षेत्र निवडा आणि चांगले मित्र. तसेच मोबाईल चा अतिवापर टाळण्याचे आव्हान केले. आलेल्या सर्वांचे आभार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे यांनी मानले.

See also  नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी