प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी संसदरत्न पुरस्काराने सन्मानित

पुणे: राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांना संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन येथे आयोजित सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण झाले. प्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आदी उपस्थित होते.

प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी लोकसभा आणि राज्यसभेतील उल्लेखनीय कार्याबद्दल खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा १७ खासदारांना या पुरस्काराचा मान मिळाला. राज्यसभेची पहिलीच टर्म असलेल्या प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत सक्रिय सहभाग नोंदवत सर्वच आघाड्यांवर उल्लेखनीय व लोक-देशहिताचे मुद्दे मांडत प्रभावी कामगिरी केली. सर्वोत्तम कामगिरीसाठी डॉ. कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. यंदा राज्यसभेतील प्रभावी कामगिरीसाठी निवड झालेल्या खासदारांमध्ये प्रा. डॉ. कुलकर्णी यांचा समावेश झाल्याने महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पुण्यासाठी ही गौरवाची बाब ठरली आहे.

प्रा. कुलकर्णी यांनी महिला आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, वक्फ बोर्डाच्या संबंधित विषयांवर संसदेमध्ये सातत्याने मुद्देसूद भाष्य केले आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी ग्रामीण भागातील महिलांमध्ये वाढत चाललेल्या कर्करोगाच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तसेच नवीन शिक्षण धोरणासंबंधित काही सूचना केल्या होत्या.

पुरस्कार स्वीकारताना प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “हा सन्मान केवळ माझा नाही, तर जनतेच्या अपेक्षा संसदेत प्रभावीपणे मांडण्याच्या प्रयत्नांचा गौरव आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधीची खरी ओळख त्याच्या कृतिशीलतेत असते. पहिल्यांदाच खासदार झालेली असताना संसदरत्न पुरस्कार मिळणे ही जनतेच्या आशीर्वादाची पावती आहे. लोकहितासाठी यापुढे परखडपणे भूमिका मांडत राहील.”

See also  'दगडूशेठ' गणपती ट्र्स्टतर्फे ११,७६४ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी