औंध : औंध येथील औंधगाव व्यायाम शाळेच्या समोर मुख्य रस्त्यावर पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दुरुस्ती कामासाठी खोदलेला खड्डा महिनाभर तसाच असून या खड्ड्यांमध्ये पाणी साठत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत मनसेचे पदाधिकारी निलेश जुनवणे यांनी कारवाई करण्याची मागणी केली.
औंधगाव व्यायाम मंडळासमोर परिहार चौकातून गावठाणाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेले महिनाभर पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाईपलाईनच्या कामासाठी खोदकाम केले आहे. पाणीपुरवठ्याची लाईन जोडण्यासाठी व दुरुस्तीसाठी करण्यात आलेले खोदकाम गेले महिनाभर तसेच आहे. या खड्ड्यामध्ये पाणी साठत असून या पाण्यात मच्छर निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जवळच गायकवाड उद्यानामध्ये नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच रस्त्यावरील वाहतुकीला देखील याचा मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
औंध गावठाणाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पाणीपुरवठा विभागाने खोदलेला खड्डा त्वरित मुजवावा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा निलेश जुनवणे यांनी दिला आहे.