एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात

पुणेः  भारत माता की जय, वंदे मातरम्… अशा घोषणांचा जयघोष, पारंपारिक वेशामध्ये नटलेले चिमुकले, मॅनेट कॅडेट्सची अभूतपूर्व कवायत आणि हजारो विद्यार्थ्यांच्या देशभक्तीने भारलेल्या वातावरणात येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या ‘मॅनेट’ इमारतीच्या प्रांगणात भारताचा ७९वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  
नौदल कर्मचाऱ्यांचे माजी उपप्रमुख, व्हाइस अ‍ॅडमिरल मुरलीधर एस. पवार हे समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासह, व्यासपीठावर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, कुलगुरू प्रा.डॉ.राजेश एस., प्रोवोस्ट प्रा.डाॅ.सायली गणकर, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हाइस अ‍ॅडमिरल मुरलीधर एस. पवार बोलताना म्हणाले, आपल्या महाराष्ट्रासह भारतीय नौदलाला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये हिंदवी राष्ट्र निर्माणाची प्रेरणा राष्ट्रमाता जिजाबाईंनी पेरली. अगदी तशाच प्रकारे आजच्या पिढीला घडविण्याची जबाबदारी प्रथम घरच्यांची आणि नंतर त्यांच्या शिक्षकांची आहे. आपल्याला भारताला जगात महासत्ता म्हणून प्रस्तापित करायचे आहे. ज्यासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. त्यामुळे, युवकांनी स्वतःला सुदृढ ठेवत, अमली पदार्थांपासून लांब राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

डाॅ.मंगेश कराड यावेळी म्हणाले, भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. अनेकांनी दिलेल्या बलिदानामुळे आज आपण इथे आहोत. त्यामुळे,  आजच्या दिनी स्वातंत्र्यविरांसह देशाच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या शेतकरी, कामगार वर्गाचेही स्मरण करायला हवं. अशात विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची मुख्य जबाबदारी ही युवकांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे, कौशल्याधिष्ठीत युवकांची पिढी घडवून त्यांना देशासमोरील समस्या सोडविण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजरोहण सोहळ्याने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार ‘मॅनेट’च्या कॅडेट्सतर्फे करण्यात आले.

See also  जिल्ह्यातील सर्व  शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर