“पत्रकार बांधवांनी भूजलविषयक तांत्रिकतेबाबत ठाम आग्रही भूमिका घ्यावी : उपेंद्रदादा धोंडे, सहज जलबोधकार, पुणे

पुणे : महाराष्ट्रातील 70 टक्केहून अधिक जलविषयक गरजांचे अवलंबित्व ज्या भूजलावर आहे, त्या भूजल विषयाबद्दलच समाजात प्रचंड अनास्था आहे आणि हे अज्ञानच महाराष्ट्र राज्याला सततपणे दुष्काळी स्थितीला द्यावे लागण्याचे मुख्य कारण आहे. महाराष्ट्राला यावर्षी भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे आणि दुर्दैवाने या आपत्ती संदर्भात पूर्वनियोजन म्हणून शासकीय वा गैरशासकीय पातळीवरील प्रयत्न पाहता आपण प्रचंड गाफील आहोत असे म्हणावे लागेल. याच पार्श्वभूमीवर सहज जलबोध अभियान अंतर्गत सदानंद रिसौर्ट, बाणेर, पुणे याठिकाणी पत्रकार बांधवांसाठी एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम “परिसंवाद: दुष्काळमुक्त महाराष्ट्र आणि भूजल” पार पडला.

जर जलक्षेत्रात आपण प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करू शकलो तर एक जलधर नकाशा आणि सोबत गावासाठी पाण्याच्या ताळेबंदाचे गणितं/आकडेवारी असलेली पुस्तिका” या स्वरूपात, कोणत्याही मोठ्या आर्थिक तरतूदीविना, तसेच शासकीय वा गैरशासकीय संस्थेच्या माध्यमातूनच नव्हे तर फक्त स्थानिक जागरूक नागरिकांच्या योगदानातून जल आराखडा निर्माण करता येतो. यातून स्थानिक पातळीवर जल संधारण आणि जल व्यवस्थापन संबंधित सर्व कृती कार्यक्रमांसाठी परिपूर्ण तांत्रिक मदत निश्चितपणे होते यासंदर्भात सविस्तर माहिती या कार्यक्रमात दिली गेली.

यावेळी सहज जलबोधकार म्हणून महाराष्ट्रात सुपरिचित उपेंद्रदादा धोंडे, वरीष्ठ भूजलवैज्ञानिक, जलशक्ती मंत्रालय यांनी पाझर तलाव, डोह निर्माण, विहीर पुनर्भरण आणि जल आराखडा निर्माण संबंधी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली तसेच जलसाक्षरता प्रचार-प्रसारात पत्रकारीतेचे महत्व, जलक्षेत्रातील तांत्रिकता स्थानिक पातळीवर समजण्यासाठी अभियान अंतर्गत सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही श्रोत्यांना अवगत केले.

या प्रसंगी मागील 3-4 वर्षांत, जल आणि पर्यावरण क्षेत्रात आग्रही भूमिका मांडत, तदनूसार सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार्या निसर्ग रक्षकांचा सन्मान देखील केला गेला. पुणे शहरातील बावधन परिसरात असलेल्या जिवंत झर्याच्या संरक्षणासाठी आग्रही भूमिका घेणारे श्री. शैलेन्द्र पटेल तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील वृक्ष कत्तल आणि वृक्षगणना हे विषय विशेष परिश्रमपूर्वक लावून धरणारे श्री. प्रशांत राऊळ यांचा सहज जलबोध अभियानाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान सपत्नीक स्वरूपात केला गेला.

2023-24 या वर्षी महाराष्ट्रातील किमान 200 पेक्षा जास्त गावांत जल आराखडा पुर्ण करायचा संकल्प करण्याचे आवाहन देखील केले गेले आणि यामध्ये कोण सहभागी होऊ शकते याबद्दलचे निकष सांगून वैयक्तिक अथवा सामूहिक स्तरावर जे कुणी असा उपक्रम राबवू इच्छितात अशा सर्वांना तांत्रिक मार्गदर्शनाची हमी देत सहज जलबोध अभियानात सहभागी करून घेतले जाईल आणि सर्वांची तशी पूर्वनोंदणी केली जाईल असे आश्वासन दिले गेले.

या परिसंवाद कार्यक्रमासाठी पुणे शहरातील व पुण्याबाहेरूनही सर्व महत्त्वाच्या मासिक, साप्ताहिक – वर्तमानपत्र आणि डिजिटल प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी- पत्रकार बांधव तसेच सहज जलबोध निसर्गरक्षक हजर होते.

यावेळी श्रोत्यांमधून अनिल पाटील, ज्ञानेश्वर भंडारे, गणेश सातव, सचिन पुणेकर, विनायक कालेकर यांनी देखील संवाद साधला. भूजल व्यवस्थापन विषयात कोणत्याही प्रकारच्या गटतट आणि पुर्वग्रहाविना अशीच खुली चर्चा व्हावी आणि यातूनच संपूर्ण परिसरात जलक्षेत्रातील तांत्रिकतेबाबत सकारात्मक संदेश सर्वदूर पोचण्यासाठी मदत होईल हा आशावाद यावेळी व्यक्त केला गेला.

या कार्यक्रमात प्रास्ताविक सुत्र संचालन श्री. पुष्कर कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वास सुर्यवंशी, मयूर बागूल, राहूल घोलप यांनी प्रयत्न केले.

See also  कष्टकरी, कामगारांनी अनुभवली पुणे मेट्रोची सफर -वाडेकर दाम्पत्याचा पुढाकार