पुणे: भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे “इंटर्नशिप व ऑन-द-जॉब ट्रेनिंग जनजागृती कार्यशाळा” मोठ्या उत्साहात पार पडली. हा उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात आला होता. या कार्यशाळेत १४४ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले, “इंटर्नशिप म्हणजे वर्गखोल्याबाहेरील खरी शिकवणी आहे. ती विद्यार्थिनींना आत्मविश्वास, कौशल्ये आणि उद्योगक्षेत्राशी जुळवून घेण्याची ताकद देते.”
प्रमुख मार्गदर्शक डॉ. योगेश पवार यांनी विद्यार्थिनींना सल्ला दिला, “जेव्हा तुम्हाला काम कसे करायचे हे उमगते, तेव्हा अर्धे काम पूर्ण झालेले असते.” त्यांनी प्रत्यक्ष अनुभव व उद्योगातील काही महत्त्वाचे नियम शेअर केले. पुढे डॉ. प्रकाश शर्मा यांनी स्वतःच्या इंटर्नशिप व शैक्षणिक प्रवासाची कहाणी सांगत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, “अडथळे आले तरी थांबू नका, पुन्हा मार्गावर या आणि आपल्या आवडीचा पाठपुरावा करा.”
सौ. मानसी बंनकर यांनी मुलींना उद्देशून ठामपणे सांगितले, “स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वावलंबी बना आणि स्वतःला सातत्याने पुढे ढकला.” त्यानंतर श्री. करण आंतुरकर यांनी उद्योगातील वास्तव अधोरेखित करताना सांगितले, “उद्योगक्षेत्रात माणुसकी आणि कौशल्याला फार मोठे महत्त्व आहे. प्रत्येकाने ‘जॅक ऑफ ऑल अँड मास्टर इन वन’ व्हायला हवे.” त्यांनी स्वतःचा इंटर्नशिप अनुभवही विद्यार्थिनींना सांगितला.
सामाजिक जाणिवा रुजविताना सौ. सीमा सावंत यांनी दीपस्तंभ एनजीओ चे कार्य विद्यार्थिनींसमोर ठेवले. त्या म्हणाल्या, “अपंग मुलांसाठी आम्ही करत असलेल्या कामात इंटर्नशिप किंवा स्वयंसेवेच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे. हे काम तुमच्या करिअरसोबतच तुमच्या व्यक्तिमत्त्वालाही दिशा देईल.”
यानंतर श्री. समीर आंतुरकर यांनी विद्यार्थिनींना नवोपक्रमाचे महत्त्व समजावताना सांगितले, “ग्राहककेंद्रित विचारसरणी हीच आजच्या उद्योगातील यशाची गुरुकिल्ली आहे. नवोपक्रमाचे चार स्तंभ आत्मसात केल्यास विद्यार्थीनींना उद्योगात स्थान मिळवणे सोपे जाईल.”
विजय पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “तुमच्या वाटचालीत योग्य दिशादर्शन करणारा मार्गदर्शक शोधा. मजबूत मूलतत्त्वे, तयारी आणि चांगले प्रोफाइल या गोष्टी इंटर्नशिपसाठी अत्यंत आवश्यक आहेत.या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. एस. एम. राजभोज यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विभाग प्रमुख व उपप्राचार्य उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी या उपक्रमातून इंटर्नशिपचे महत्त्व, उद्योगक्षेत्रातील वास्तव आणि सामाजिक बांधिलकी याबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळवले. ही कार्यशाळा त्यांच्या आत्मविकासासाठी व भविष्याच्या करिअरसाठी नवी उभारी देणारी ठरली.