पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक लवकर संपवावी; यासाठी मानाच्या पाचही गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने लवकर मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. तसेच, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाचा पुढाकार भविष्यात पुण्याची गणेश विसर्जन मिरवणुकीला दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे संपूर्ण महाराष्ट्रात वेगळेच आकर्षण असते. पुणे जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणे शहरात येत असतात. पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर संपावी यासाठी इतिहासात मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने मिरवणुकीत लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मंडळाने आपला शब्द तंतोतंत पालन करत ४ वाजता सहभागी होऊन ८ वाजून ५० मिनिटांनी गणपतीचे विसर्जन केले.
मंडळाच्या या पुढाकाराने विसर्जन मिरवणूक लवकर संपण्यास मदत झाली. त्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दगडूशेठ गणपती मंडळ मंदिरात जाऊन, गणपतीचे दर्शन घेऊन पूजा केली. तसेच, मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन आभार मानले. यासोबतच मंडळाचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा विशेष सत्कार केला.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पुण्याचा गणेशोत्सव सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातून लाखो भाविक दरवर्षी गणेशोत्सवचा आनंद घेण्यासाठी पुण्यात येत असतात. यावेळी हजारो भाविक पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचे दर्शन देखील घेतात. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मिरवणुकीलाही मोठी गर्दी असते.
नामदार पाटील पुढे म्हणाले की, यंदा पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने एकमताने विसर्जन मिरवणूक लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मंडळाने आपला शब्द तंतोतंत पालन करत दुपारी ४ वाजता मिरवणुकीत सहभाग घेतला. तर ८ वाजून ५० मिनिटांनी गणपतीचे विसर्जन झाले. यामुळे गणेश विसर्जन मिरवणूक लवकर संपण्यास मदत झाली. मंडळाचा हा पुढाकार भविष्यात सर्वांसाठी दिशादर्शक आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक ही सूर्योदयापूर्वी संपण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, मंडळाच्या इतिहासात पालकमंत्र्यांकडून अशा प्रकारे कौतुक होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची भावना अध्यक्ष माणिकदादा चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच, गणेश विसर्जन मिरवणुकीचे वैभव कायम टिकवण्यासाठी नेहमीच कार्यरत राहण्याची ग्वाही चव्हाण यांनी यावेळी दिली.