वीज प्रकल्पाचे काम कालबद्ध कार्यक्रम राबवून गतीने पूर्ण करा- ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

पुणे, दि. २९ : पुणे जिल्ह्यातील वाढत्या वीज गरजांची पूर्तता करण्यासाठी सुरु असलेले प्रकल्प कालबद्ध कार्यक्रम राबवून विहित मुदतीत पूर्ण करावे, ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करून त्यांना स्थिर, गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा करण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी बैठकीत दिले.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) येथे आयोजित बैठकीत पुणे जिल्ह्यातील वाढत्या वीज गरजांची पूर्तता करण्यासाठी चालू, प्रलंबित आणि प्रस्तावित प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी महावितरणचे विभागीय संचालक भुजंग खंदारे, पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोळप, महानिर्मितीचे मुख्य अभियंता संजय कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.

श्रीमती साकोरे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य उद्योगपुरक राज्य असल्याने विविध प्रकल्पात गुंतवणूक होत आहे, पुणे व पिंपरी चिंचवडमधील उद्योगधंद्यांचा विचार करता त्यांना लागणारी वीज उपलब्ध करुन दिली पाहिजे, उद्योग उभे करतांना अडचण येता कामा नये. उद्योगधंदे, नागरिकांना मुबलब प्रमाणात वीज मिळेल, प्रकल्प सुरु करण्यापूर्वी आगामी 30 वर्षाचा विचार करुन प्रकल्पाचे नियोजन करावे. वीज खंडीत होणार नाही तसेच कामे प्रलंबित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

प्रकल्पाची कामे करतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्याकरिता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेटी देवून संबंधितांशी चर्चा करुन मार्ग काढावा. प्रकल्पाच्या कामाचे दैंनदिन संनियंत्रण करावे. शहरातील जागेबाबत प्रलंबित विषय मार्गी लावण्याकरीता सतत पाठपुरावा केला पाहिजे. मंजूर कामे सुरु करुन वेळेत पूर्ण झाले पाहिजे. महापरेषणकडून कागदपत्र व प्रस्ताव मंजूरी जलद गतीने करावी. विजेची वाढत्या मागणी, नवे प्रकल्प उभारणीबाबतची स्थिती, ग्रीड क्षमता वाढविण्याचे नियोजन, नवीकरणीय ऊर्जेच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा कराव्यात, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती साकोरे यांनी दिले.

यावेळी श्री. कोळप आणि श्री. कुऱ्हाडे यांनी पुणे जिल्ह्यातील सुरु असलेले  चालू, प्रलंबित आणि प्रस्तावित वीज प्रकल्पांबाबत पीपीटीद्वारे माहिती दिली.

See also  परदेशात जाण्याची गरज नाही, आता भारतात मुबलक संधी उपलब्ध - अमेरिकेचे खासदार श्री ठाणेदार; पीसीयू च्या वतीने श्री ठाणेदार यांचा ‘लिव्हिंग लिजंड ऑनर’ पुरस्कार देऊन गौरव