कोथरूड : महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पथ विभागातील अधिकाऱ्यांबरोबर बालभारती पौड रोड ची पाहणी केली.
यावेळी त्यांच्याबरोबर पथविभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता अभिजीत आंबेकर, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भुतडा, उपअभियंता शैलेश वाघोलीकर, तसेच मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे व वार्ड ऑफिसर विजय नायकल हे उपस्थित होते.
सदर जागा पाहणी दरम्यान या रस्त्याची अलाइनमेंट तसेच जागेवरील एकूण परिस्थितीची पाहणी केली. रस्त्याच्या कुठल्या भागामध्ये रस्ता एलिवेटेड करण्यात येणार आहे याची देखील माहिती घेतली. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स (ईसी) साठी लवकरात लवकर अर्ज करून इसी प्राप्त करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे त्यांनी आदेश या भेटी दरम्यान दिले. जी झाडे लावणे गरजेचे आहे ती झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात यावीत असे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागेवर स्वतः वृक्षारोपण करून या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ त्यांनी केला. त्यांच्यानंतर खात्यातील इतर अधिकाऱ्यांनी देखील वृक्षारोपण केले व खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष लावण्याबाबत आयुक्तांना ग्वाही दिली. स्थानिक व दुर्मिळ अशी झाडे लावण्याबाबत आवश्यकतेवर आयुक्तांनी भर दिला. सध्याच्या अस्तित्वातील रस्त्यांवरील कोंडी दूर करण्याच्या अनुषंगाने सदर रस्त्याचे काम त्वरित हाती घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आयुक्त यांनी केले.