पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाषाण तलाव येथील सुतारवाडी पक्षी अभयारण्य वाचवण्यासाठी आणि RMC प्लांट चे चालू असलेले काम हटविण्यासाठी रविवारी 23 नोव्हेंबर 2025 रोजी जन आंदोलन करण्यात येणार आहे.
सुतारवाडी येथील पाषाण तलावाजवळ राष्ट्रीय महामार्ग लगत आर एम सी काँक्रीट प्लांट उभारण्याचे काम सुरू आहे. पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या या परिसरामध्ये प्रदूषण करणाऱ्या प्लांट मुळे सुतारवाडी पक्षी अभयारण्य ही पक्ष्यांची नैसर्गिक आदिवासाची जागा बाधित होणार आहे. सध्या या क्षेत्रात सुरू झालेल्या RMC (रेडी-मिक्स काँक्रीट) प्लांट च्या चालू असलेल्या कामामुळे पर्यावरणीय संतुलनास तसेच दैनिंदन मानवी जीवनावर गंभीर धोका निर्माण होईल. या प्लांटमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे पक्षी, प्राणी आणि संपूर्ण पर्यावरण धोक्यात येईल. तसेच या परिसरात उभारण्यात आलेल्या पत्र्याचे शेड व बांधकामे ही एच ई एम आर एल पासून प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रांमध्ये येत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष मयूर सुतार व पाषाण बाणेर परिसरातील विविध पर्यावरण संस्थांनी व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी या काँक्रीट प्लांटला विरोध दर्शवला आहे.
मयूर सुतार म्हणाले, “सुतारवाडी पक्षी अभयारण्य केवळ पक्ष्यांचेच नव्हे तर संपूर्ण परिसरातील पर्यावरणीय समतोल राखणारे महत्त्वाचे केंद्र आहे. या क्षेत्रात RMC प्लांट चालू करणे हा पर्यावरणविघातक आणि अवैध कारवाई आहे.”
तसेच संबंधित विषयावर बंदी घालने किंवा काम बंद करण्यासाठी केवळ १० दिवसांचा अवधी दिला जाईल अन्यथा मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल.
आंदोलनाद्वारे खालील मागण्या करण्यात येणार आहेत:
१.सुतारवाडी पक्षी अभयारण्याचे संपूर्ण रक्षण करणे
२. पर्यावरणास घातक ठरणाऱ्या RMC प्लांटचे काम ताबडतोब हटवणे [ बंद करणे ]
३. पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
तसेच काही सामाजिक संघटनांनी सुद्धा या संबंधित आंदोलनाला पाठिंबा दिला आहे . पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्प रक्षक असोशिएशन, सुतारवाडी मराठा सहाय्यक संस्था, सिद्देटेक हौसिंग सोसायटी, लेक व्ह्यू सोसायटी, तसेच सुतारवाडी ग्रामस्थांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
























