बाणेर : महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुणे शहरात ‘उड्डाण नारी शक्ती रन 3.0’ या भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. WAMA या संस्थेच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे आयोजन पूनम विशाल विधाते यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 5 वाजता श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे–बालेवाडी, पुणे येथे पार पडणार आहे.
या मॅरेथॉनमध्ये महिलांसाठी 10 किमी, 5 किमी व 3 किमी अशा विविध अंतरांच्या शर्यती ठेवण्यात आल्या असून ‘Run For Women Empowerment’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम पुण्यातील महिलांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण करत आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार तथा राज्यसभा सदस्या सौ. सुनैत्रा अजित पवार, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच आमदार श्री. शंकर मांडेकर (भोर राजगड मुळशी–203), आमदार श्री. सुनील शेळके (मावळ), राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर (पूर्व) अध्यक्ष श्री. सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर (पश्चिम) अध्यक्ष श्री. सुभाष जगताप, माजी नगरसेवक श्री. प्रमोद निम्हण, श्री. बाबुराव चांदेरे, श्री. नितीन कळमकर यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महिलांचे आरोग्य, आत्मविश्वास आणि सामाजिक सहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून, पुण्यातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित असल्याचे आयोजकांनी सांगितले.























