नागपूर – नागरिकांना त्रास होत असल्याने रात्रीच्या वेळी चालणारी बांधकामे बंद करावीत, अशी जोरदार मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत बोलताना (गुरुवारी) केली.
अधिवेशनामध्ये लक्षवेधी मुद्द्यांद्वारे बांधकाम नियमावलीचा विषय शिरोळे यांनी मांडला. यावेळी बोलताना ते म्हणाले, पुणे शहर हे वेगाने वाढत आहे. शहरभर दुप्पट वेगाने बांधकामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी रात्री बे रात्रीच्या वेळेस बांधकामे चालतात. बांधकामासाठीची वाहने, अवाढव्य यंत्रसामग्री यांच्या आवाजाचा त्रास आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना होत असतो. याबाबतच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर महापालिकेकडून बांधकाम कोणत्या वेळेत सुरू ठेवावे तसेच हे काम करताना आजूबाजूच्या नागरिकांना काही त्रास होणार नाही, यासाठी काय काळजी घ्यावी, अशी कोणतीही नियमावली तयार केलेली नाही असे निदर्शनास आले आहे. तरी पुणे महानगरपालिकेस बांधकाम नियमावली करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी ८ ते रात्री १० या वेळेतच बांधकामे करता येतात. त्या व्यतिरिक्तच्या वेळात बांधकामे करता येणार नाहीत, असे आदेश आहेत. पण, हे आदेश डावलून रात्रीच्या वेळी बांधकामे सुरू असतात. ही बाब आमदार शिरोळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
घर ताज्या बातम्या रात्रीच्या वेळी चालणारी बांधकामेबंद करावी – आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विधानसभेत मागणी