बालेवाडी : पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार, बैठका, स्नेहमेळावे आणि प्रचार फेऱ्यांमुळे प्रभागात निवडणूक वातावरण तापू लागले असतानाच, प्रचारादरम्यान एका वेगळ्याच मुद्द्याची सातत्याने चर्चा होताना दिसत आहे,ती म्हणजे अटल सेवा महाआरोग्य शिबिर.
या पार्श्वभूमीवर लहू बालवडकर यांनी केवळ प्रचारापुरते न थांबता, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली उपस्थिती ठळक केली आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस आणि महाळुंगे या परिसरात घराघरांत जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधताना, अनेक ठिकाणी “ते आरोग्य शिबीर” हा विषय आपसूकच चर्चेत येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रचारातन मांडलेलं, पण लोकांच्या तोंडी असलेलं शिबीर
२४ व २५ जानेवारी २०२५ रोजी बालेवाडी येथे लहू बालवडकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या अटल सेवा महाआरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या शिबिरातून तब्बल २५ हजारांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. ६५० पेक्षा अधिक मोफत शस्त्रक्रिया, अंध व अपंग बांधवांसाठी आवश्यक साहित्याचे वाटप, ६,५०० हून अधिक नागरिकांना मोफत चष्मे, तसेच हजारो रुग्णांना आवश्यक औषधांचे वितरण करण्यात आले होते.
विशेष म्हणजे, सध्याच्या प्रचारादरम्यान या शिबिराचा थेट उल्लेख न करताही नागरिकांकडूनच त्याची आठवण करून दिली जात आहे. “त्या शिबिरामुळे उपचार मिळाले”, “महागड्या तपासण्या मोफत झाल्या”, “घरातील वडिलांची शस्त्रक्रिया तिथेच झाली” अशा प्रतिक्रिया प्रचार फेऱ्यांमध्ये ऐकायला मिळत असल्याचे स्थानिक पातळीवर दिसून येते.
*गावभेट दौऱ्यातून संवाद, चर्चेचा सूर आरोग्याकडे*
गेल्या काही आठवड्यांत लहू बालवडकर यांनी प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या सातही गावांमध्ये सलग दहा दिवसांचा गावभेट दौरा केला. या दौऱ्यात रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, नागरी सुविधा यांसह झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर चर्चा झाली. मात्र या संवादात वारंवार आरोग्यविषयक उपक्रमांचा उल्लेख होत असल्याचे चित्र आहे.विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण मतदारांमध्ये आरोग्य शिबिराचा अनुभव हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून, “फक्त बोलणं नाही, प्रत्यक्ष काम” अशी भावना व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या अंतर्गत पातळीवरही प्रभाग क्रमांक ९ संदर्भात पर्यायांचा आढावा सुरू आहे. स्थानिक पातळीवर सक्रिय असलेले, सातत्याने जनसंपर्क ठेवणारे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विश्वास निर्माण करणारे चेहरे पक्षाच्या विचाराधीन असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर लहू बालवडकर यांच्या सह अनेक नाव चर्चेत येत असल्याचे बोलले जात आहे.
प्रचाराच्या धावपळीत जिथे बहुतांश उमेदवार सभा, बैठक आणि घोषणांवर भर देताना दिसत आहेत, तिथे अटल सेवा महाआरोग्य शिबिरासारख्या उपक्रमामुळे निर्माण झालेली सकारात्मक चर्चा प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
























