मुंबई : बाणेर–बालेवाडी परिसरातील युवा नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभेचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी आज देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत स्थानिक राजकारण, संघटनात्मक मजबुती आणि विकासाभिमुख मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या भेटीनंतर जयेश मुरकुटे यांनी सोशल मीडियावर
“कड्यांस माझ्या उंचीचा अंदाज नसावा,
कोसळताना नभास घेऊन कोसळलो मी…”
अशी सूचक आणि आत्मविश्वास दर्शवणारी पोस्ट शेअर करत आगामी राजकीय वाटचालीचा स्पष्ट संदेश दिला आहे.
जयेश मुरकुटे यांच्या माध्यमातून बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण–सोमेश्वरवाडी, सुतारवाडी या उच्चशिक्षित व आयटी कर्मचारी बहुल परिसरात अभ्यासू, उच्चशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेचे तरुण नेतृत्व पुढे येताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने प्रभागातील समस्या अभ्यासून मुद्देसूद मांडणी करत नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.
पवार साहेब तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही वेळोवेळी जयेश मुरकुटे यांच्या पाठीशी ठाम भूमिका घेत जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या विविध उपक्रमांना उपस्थिती लावली आहे. या भेटीदरम्यान शरद पवार यांनी “लढ आणि जिंकून ये” असा स्पष्ट संदेश देत जयेश मुरकुटे यांचे मनोबल वाढवले. या भेटीमुळे पुणे शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
























