निमगाव म्हाळुंगी : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी–रांजणगाव सांडस पंचायत समिती गणात भारतीय जनता पार्टीचे मातब्बर नेतृत्व, माजी सरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब काळे यांना पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून देण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. संघर्ष, समाजसेवा आणि विकासकामांच्या बळावर घडलेले हे नेतृत्व आज संपूर्ण गणाचे आशास्थान ठरत आहे.
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या बापूसाहेब काळे यांचे बालपण मामा-मामींकडे माळवाडी (तळेगाव ढमढेरे) येथे गेले. याच ठिकाणी स्व. संभाजीराव भुजबळ यांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत स्वयंसेवक म्हणून कार्य करत त्यांनी संस्कारांची पायाभरणी केली. स्व. संभाजीराव भुजबळ व माजी पंचायत समिती सदस्य अरुणराव भुजबळ यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत त्यांनी सामाजिक कार्याचा वसा स्वीकारला.
गरिबीच्या चटक्यांतूनच त्यांनी एक ठाम निश्चय केला —
“माझ्या लोकांना पुन्हा कधीही गरिबीच्या दारात उभं राहू द्यायचं नाही.”
या निर्धारातूनच सन 2001 पासून त्यांच्या सामाजिक कार्याची ज्योत प्रज्वलित झाली.
शिवाजीनगर येथे मामाच्या वडापाव–चहाच्या स्टॉलवर काम, रात्री वॉचमनची नोकरी आणि मिळेल ते बिगारी काम करत त्यांनी पुण्यात शिकायला येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत निवास, शैक्षणिक मदत आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. “विद्यार्थी घडला की समाज घडतो” हा मंत्र त्यांनी कृतीत उतरवला.
पुण्याचे माजी नगरसेवक तथा समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष आदरणीय मिलिंदभाऊ एकबोटे यांच्या सहवासात त्यांना सामाजिक कार्याची स्पष्ट दिशा मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक, सामाजिक व राष्ट्रकार्याचे संस्कार अधिक दृढ झाले. याच काळात त्यांना मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सेवेत संधी मिळाली, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात स्थैर्य आले.
सन 2006 मध्ये त्यांची अखिल भारतीय कृषी गो-सेवा संघाच्या शिरूर तालुकाध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती, क्रांतीरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे क्रांतिज्योत, एक दिवा सैनिकांसाठी उपक्रम, शिवराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवक संघटन, गड-किल्ले मोहिमा, शिवजयंती उत्सव, व्यसनमुक्ती, शिक्षणप्रोत्साहन असे असंख्य उपक्रम त्यांनी राबवले.
या कार्याची दखल घेत त्यांना युवा समाजभूषण पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड (नवी दिल्ली) यांसह अनेक मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना ग्रामपंचायत सदस्य व नंतर सरपंचपदी बिनविरोध निवडून दिले. सरपंच म्हणून त्यांच्या कार्यकाळात गावाचा सर्वांगीण विकास साधत निमगाव म्हाळुंगीला आदर्श गावाची ओळख मिळाली.
आज बापूसाहेब काळे हे उच्चशिक्षित (एम.कॉम., बी.एड.), अभ्यासू, प्रामाणिक आणि जनतेशी थेट नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आता ते निमगाव म्हाळुंगी–रांजणगाव सांडस पंचायत समिती गणातून पंचायत समिती सदस्यपदासाठी जनतेच्या सेवेसाठी उभे आहेत.
गावाचा विश्वास विकासात बदलणाऱ्या या नेतृत्वावर संपूर्ण गणातील नागरिकांनी विश्वास व्यक्त करत, बापूसाहेब काळे यांनाच पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून देण्याचा निर्धार केला आहे. संघर्षातून उभा राहिलेला हा नेता विकासाचा दीप अखंड प्रज्वलित ठेवेल, असा ठाम विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.























