बाणेर : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या पुनम विशाल विधाते यांनी आपल्या विकासात्मक व्हिजनची स्पष्ट मांडणी केली आहे. “माझा प्रभाग… माझे व्हिजन…” या संकल्पनेतून पर्यावरणपूरक व शाश्वत विकासावर भर देत पाषाण तलाव, राम नदी व मुळा नदी सुधार प्रकल्प राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
पाषाण तलाव परिसराचे सौंदर्यीकरण, प्रदूषणमुक्ती, जैवविविधतेचे संवर्धन तसेच नागरिकांसाठी सुरक्षित व स्वच्छ सार्वजनिक जागा निर्माण करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे विधाते यांनी सांगितले. त्याचबरोबर राम नदी व मुळा नदीच्या पात्राची स्वच्छता, काठांचे मजबुतीकरण, सांडपाणी व्यवस्थापन आणि पूरनियंत्रणासाठी आधुनिक उपाययोजना राबविण्यावर भर दिला जाणार आहे.
या विकासकामांमुळे प्रभागातील पर्यावरणीय समतोल राखला जाईल, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर तोडगा निघेल तसेच परिसरातील जीवनमान उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “विकास म्हणजे केवळ रस्ते-नाले नव्हे, तर निसर्गाचे संरक्षण आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरण निर्माण करणे,” असे मत पुनम विशाल विधाते यांनी मांडले.
प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेत, त्या आधारे विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. चिन्ह – कप बशी असलेल्या या अपक्ष उमेदवाराला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, स्वच्छ व पारदर्शक प्रशासन देण्याचा विश्वास त्यांनी मतदारांना दिला आहे.
























