सुस-बाणेर-पाषाण मिसिंग लिंक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाची हालचाल वेगात
अतिरिक्त आयुक्तांकडून संयुक्त जागा पाहणी; तीन महिन्यांत महत्त्वाचे रस्ते ताब्यात घेण्याचे निर्देश

पुणे : सुस–बाणेर–पाषाण प्रभागातील प्रलंबित ‘मिसिंग लिंक’ रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी प्रशासनाने हालचाली वेगात केल्या आहेत. मा. चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी महापालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी संबंधित भागांची संयुक्त जागा पाहणी केली.

पाषाण येथील सोमेश्वर मंदिरापासून बाणेर-बालेवाडी परिसरापर्यंत माननीय महानगरपालिका सभासदांच्या समवेत पाहणी करण्यात आली. कसपटेवस्ती येथील पुणे व वाकड भागाला जोडणाऱ्या पुलाजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा तसेच उर्वरित आवश्यक जागेचा आढावा घेण्यात आला. याशिवाय सोमेश्वर मंदिरामागील डीपी रस्ते व इतर मिसिंग लिंकच्या जागांची पाहणी करण्यात आली. बालेवाडी येथील सुस-नांदे रस्त्यावरील सनीज वर्ल्डजवळील खिंडीच्या रुंदीकरणाच्या कामाचीही तपासणी करण्यात आली.

यावेळी संबंधित जागामालकांना तडजोडीच्या तत्वावर एफएसआय किंवा टीडीआरच्या मोबदल्यात जागा त्वरित महापालिकेच्या ताब्यात देण्याची विनंती करण्यात आली. भूसंपादन व प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांबाबत अतिरिक्त आयुक्तांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच पथ विभाग, बांधकाम विकास विभाग आणि भूसंपादन विभाग यांना तातडीने समन्वय साधून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील तीन महिन्यांत महत्त्वाच्या मिसिंग लिंक रस्त्यांसाठी आवश्यक जागा ताब्यात घेऊन प्रत्यक्ष रस्ते कामे सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून त्यानुसार संबंधित विभागांकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

या पाहणीवेळी मा. श्री. बाबुराव चांदेरे, मा. श्री. अमोल बालवडकर, मा. श्रीमती रोहिणी चिमटे, तसेच मा. सौ. मयुरी राहुल कोकाटे यांच्या प्रतिनिधी म्हणून श्री. राहुल कोकाटे उपस्थित होते. याशिवाय श्री. राजेश बनकर (मुख्य अभियंता, पथ विभाग), श्री. अभिजित आंबेकर (अधीक्षक अभियंता, पथ विभाग) तसेच पथ, बांधकाम विकास व भूसंपादन विभागाचे अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.

See also  राजकीय साठमारीत उपनगर हडपसर बनले समस्यांचे आगार वाहतूककोंडी, पाणीपुरवठा, अतिक्रमण, गुन्हेगारी मुद्दे निवडणुकीत गाजणार

सदर उपक्रमामुळे सुस–बाणेर–पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.