खडकी स्टेशन ते औंध रोड पर्यंत सिमेंट रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करा – सुनील माने

औंध (प्रतिनिधि) : खडकी स्टेशन, औंध रोड या रस्त्यावर वाहतुकीच्या समस्या असल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासातून वाहनधारकांची मुक्तता होण्यासाठी खडकी स्टेशन ते ब्रेमेन चौक  हा रस्ता चांगल्या प्रतीचा तयार करण्यासाठी हा रस्ता संपूर्ण सिमेंटचा करणे गरजेचे आहे, तसेच पादचाऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ करावे. अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे.  या मागणीचे पत्र त्यांनी आज महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता रमेश वाघमारे यांना दिले. याबाबत त्यांनी या रस्त्यांच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याचे आश्वासन दिले.

सुनील माने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ब्रेमन चौक ते औंध रोड आंबेडकर चौक या रस्त्यावर वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी याबाबत मी पुणे यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन पथविभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावस्कर यांना  दिले होते. यानंतर २५ नोव्हेंबर रोजी वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांना पत्र दिले होते.  माझ्या या पत्रानुसार २८ नोव्हेंबर रोजी वाहतूक पोलिस व पथ विभागाच्या अधिकाऱ्यांसह ब्रेमेन चौक ते खडकी स्टेशन या रस्त्याची आम्ही संयुक्त पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान ब्रेमन चौक ते खडकी स्टेशन परिसरात जागोजागी रस्ता खराब असल्याचे तसेच काही ठिकाणी रस्त्याचे फक्त डांबरीकरण असल्याचे लक्षात आले.

या संयुक्त पाहणीत हा रस्ता प्राधान्यक्रमाने सिमेंट काँक्रीटचा करणे गरजेचे आहे, तसेच लोकांच्या सुविधेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ करावेत यावर एकमत झाले होते. त्या संदर्भात आधी झालेल्या चर्चेनुसार कृपया या रस्त्यासाठी लवकरात लवकर आर्थिक तरतूद करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. या मागणीवर सकारात्मकता दाखवत लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता रमेश वाघमारे यांनी दिले.

See also  संत तुकाराम नगर मधील ७५ टक्के मतदान अण्णा बनसोडे यांना होणार योगेश बहल यांचा विश्वास