प्रस्तावित मिळकतकर वाढीवर आम आदमी पार्टीचा आक्षेप; ५०० स्क्वेअर फुटांपर्यंत करमाफीचे आश्वासन भाजपने पाळावे मागणी

पुणे :  आम आदमी पार्टीने प्रस्तावित मिळकतकरवाढीला तीव्र विरोध दर्शवत सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीतील आश्वासन पाळावे, अशी मागणी केली आहे.  पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात मिळकतकरात प्रथम १० टक्के आणि त्यानंतर ५ टक्के वाढ प्रस्तावित केल्याची माहिती समोर आली आहे. स्थायी समितीत मंजूर झालेला हा प्रस्ताव आज सर्वसाधारण सभेत मांडला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, करवाढीच्या विरोधात आम आदमी पार्टीने मागील आठवड्यात महापालिकेबाहेर आंदोलन केले. महागाईने सर्वसामान्य पुणेकर त्रस्त असताना आणि अपेक्षित नागरी सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध नसताना करवाढ करणे अन्यायकारक असल्याचा आरोप पक्षाने केला. आगामी महापालिका निवडणुकीदरम्यान सत्ताधारी भाजपने ५०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या मिळकतींना पूर्ण करमाफी देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. ते आश्वासन तातडीने अमलात आणावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

पक्षाच्या निवेदनानुसार, मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात २८०० कोटींचे उत्पन्न लक्ष्य ठेवण्यात आले होते; मात्र आतापर्यंत सुमारे २२०० कोटींचीच वसुली झाली आहे. तसेच अनेक व्यावसायिक मिळकतींवर कर लागू न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तब्बल ७७०० कोटी रुपयांची थकबाकी असताना ती वसूल करण्याऐवजी प्रामाणिक करदात्यांवर करवाढीचे ओझे टाकणे अयोग्य असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.

“सत्तेसाठीची जुमलेबाजी न करता पुणेकरांना दिलेला शब्द पाळावा. ५०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या छोट्या मिळकतधारकांना पूर्ण करमाफी देऊन दिलासा द्यावा,” असे आवाहन आम आदमी पार्टी, नेते मुकुंद किर्दत यांनी केले आहे.

See also  ग्रामदैवत भैरवनाथ चरणी श्रीफळ फोडून सुतारवाडी पाषाण येथे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ