पुणे : शासनाने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अचानक फार मोठी वाढ केली तसेच गॅस सिलेंडरच्या नोंदणीचा कालावधी सुध्दा वाढविला आहे. याचा विपरीत परिणाम राज्यातील प्रत्येक कुटूंबावर होणार आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या शासनाने मोठ्या प्रमाणात गॅस दरवाढ करून जनतेचा विश्र्वासघात केला आहे. या विरूध्द आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आहे.
यावेळी अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे आधीच कठीण झाले असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एलपीजी गॅसच्या किंमती वाढवून पठाणी लुट करत आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती वाढल्या तरी त्याचा बोजा सामान्य जनतेवर पडू दिला नाही. सबसीडी देऊन जनतेला महागाईचे चटके बसू दिले नाहीत. युपीए सरकारच्या काळात घरगुती सिलेंडर ४०० रूपयांना मिळत होते, आता एका गॅस सिलेंडरसाठी ९०० रूपयांपेक्षा जास्त मोजावे लागत आहेत. सिलेंडर बुक करण्याचा कालावधीही १५ दिवसांवरून एक महिन्याचा करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीही १९०० रूपयांवर गेल्या आहेत. तसेच या सिलेंडरचे रेशनिंग करण्यात येत आहे याचा मोठा फटका विद्यार्थी, कामगार, नोकरदार, ज्यांची घरच्या जेवण्याची सोय नाही अशा लोकांना बसत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय वा व्यापारासाठी मोठ्या संख्येने लोकांना बाहेर जेवण करावे लागते, व्यावसायीक गॅसच्या किंमती वाढवल्याने व त्याचे रेशनिंग केल्याने या खाद्यपदार्थांचे भावही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गॅसची टंचाई नाही असे सरकार सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे.
सर्वसामान्य जनता तसेच हॉटेल, खानावळी, खाद्यपदार्थ बनवणारे व बनवून विकणारे छोटे व्यावसायिक या सर्वांना गॅस सिलेंडर विना अडथळा सहजपणे उपलब्ध होईल याची व्यवस्था करावी. सरकारने वाढवलेल्या किंमती तात्काळ कमी करण्यात यावी.’’
यानंतर गॅस दरवाढ कमी करण्यासंदर्भात मा. जिल्हाधिकारी, पुणे यांना निवेदन देण्यात आले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत माजी आमदार दिप्ती चवधरी, नगरसेवक प्रशांत जगताप, विशाल मलके, अश्विनी लांडगे, दिपाली डोख, सुनिल शिंदे, उपाध्यक्ष अजित दरेकर, प्राची दुधाणे, भरत सुराणा, नुरूद्दीन सोमजी, बाळासाहेब अमराळे, राज अंबिके, द. स. पोळेकर, संदिप मोकाटे, रवि ननावरे, कृष्णा सोनकांबळे, सुरेश चौधरी, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, अनुसया गायकवाड, सिमा सावंत, अनिता धिमधिमे, प्रियंका मधाळे, सुंदर ओव्हाळ, ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, अक्षय माने, संजय मोरे, राकेश नामेकर, रवि पाटोळे, सचिन सावंत, अनिल धिमधिमे, सागर धाडवे, फिरोज शेख आदी सहभागी होते.
























